मद्यधुंद पित्याने चिमुकल्याला दिले चटके
By admin | Published: August 30, 2016 06:13 AM2016-08-30T06:13:37+5:302016-08-30T06:13:37+5:30
तालुक्यातील निमखेड येथील एका मद्यधुंद पित्याने दारूच्या नशेत आपल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले.
सुमित हरकुट, चांदूरबाजार (अमरावती)
तालुक्यातील निमखेड येथील एका मद्यधुंद पित्याने दारूच्या नशेत आपल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण करून त्याला चुलीतील पेटत्या लाकडाचे चटके दिले. या क्रूरतेला जीवाच्या आकांताने विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने मारहाण केली. मुलाच्या वेदनांनी गलबललेल्या मातेने दुसऱ्या दिवशी नवऱ्याची नजर चुकवून मुलाला खासगी दवाखान्यात नेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला.
नीलेश खाडे असे या क्रूर पित्याचे नाव असून तो मजुरीचे काम करतो. दारूचे व्यसन जडल्याने तो पत्नी किरण व अडीच वर्षांचा मुलगा नैतिक याला रोज मारहाण करायचा. शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेतील नीलेशने मुलाला पाणी आणण्यास सांगितले. घाबरलेल्या मुलाच्या हातून पाण्याचा ग्लास खाली पडला. या क्षुल्लक कारणावरून नीलेशने त्याला जबर मारहाण केली व चुलीवरील गरम भाजी त्याच्या अंगावर फेकली. इतक्यावरच त्याचे समाधान झाले नाही तर त्याने त्याला चुलीतील जळत्या लाकडाचे चटकेदेखील दिले.
या कृत्याचा विरोध करणाऱ्या पत्नीलाही त्याने बेदम मारहाण केली. मुलाच्या वेदना पाहावत नसल्याने रविवारी दुपारी नीलेशची नजर चुकवून किरणने नैतिकला खासगी रुग्णालयात नेले. तिच्या मागावर असलेला नीलेशसुद्धा रुग्णालयात पोहोचला. उपचार करताना डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरांनी मुलाच्या आईला वारंवार विचारणा केली असता ती ढसाढसा रडू लागली आणि तिने सर्व हकीकत डॉक्टरांसमोर कथन केली. हा अमानवीय प्रकार पाहून डॉक्टरदेखील हादरून गेले. त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस स्टेशनला फोनवरून हकीकत सांगितली.
माहिती मिळताच स्थानिक पोलीस रुग्णालयात धडकले व नीलेशला ताब्यात घेतले. ही घटना ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने डॉक्टरांनी किरण व चिमुरड्याला घेऊन ब्राह्मणवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)