धक्कादायक! भय्यूजी महाराजांची आत्महत्या; स्वत:वर गोळी झाडून संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 02:45 PM2018-06-12T14:45:07+5:302018-06-12T15:43:50+5:30
भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केली आहे. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपवलं. कौटुंबिक वादाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भय्यूजी महाराज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय सक्रीय होते. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांच्यातील समेट, आंदोलनं, उपोषणं यांच्यातील मध्यस्थ म्हणून त्यांनी अनेकदा महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. भय्यूजी महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हटलं जायचं. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असायची. काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारनं त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराजांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्तींचं येणंजाणं असायचं. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्तींचा त्यांच्या आश्रमात राबता असायचा.
महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं होतं. तर अनेकदा किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही चर्चा होत्या.