निवडणुकीत काळी जादू, तंत्र-मंत्राचाही अवलंब
By Admin | Published: February 19, 2017 09:29 PM2017-02-19T21:29:48+5:302017-02-19T21:38:56+5:30
निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतितंत्राचा अवलंब केला जातो, असे म्हटले जाते.
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 19 - निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या नीतितंत्राचा अवलंब केला जातो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्ययही येतो. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारांवर करणी करण्याच्या उद्देशाने काळी जादू, तंत्र, मंत्राचाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अवलंब करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात संत, समाजसुधारक यांनी अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले. अलीकडच्या काळात राज्य शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असताना होली-मोशी येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये एका महिला उमेदवाराच्या घरासमोर कोणी तरी काळ्या बाहुल्या ठेवल्याचे निदर्शनास आले. घडलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रकाराची चर्चा शहरात होती.
प्रभाग क्रमांक तीनमधील महिला उमेदवाराच्या घराजवळ आणि मतदान केंद्रावर काळ्या बाहुल्या अडकविल्याचे सकाळी सात वाजताच कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. मतदान केंद्रावर लाल फडक्यात गुंडाळलेल्या बाहुलीवर या महिला उमेदवाराचे नाव लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामुळे हे दृष्य पाहून कार्यकर्ते घाबरले. त्यांनी याबाबत ही माहिती उमेदवार महिलेस दिली. त्यांनी या प्रकाराबद्दल पोलिसांनाही कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या वस्तू ताब्यात घेतल्या.
उमेदवारांवर ज्योतिषांचा प्रभाव...
निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शहरातील अनेक उमेदवारांनी ज्योतिष, बुवा यांच्या घराचे, मठाचे उंबरे झिजवले. बुवांकडून कौल घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करीत निवडणुकीला सामोरे गेले. पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक काळात काळ्या बाहुल्या, तसेच लिंबू-मिरची अडकवणे, प्रतिस्पर्ध्याच्या घरासमोर उतारा ठेवणे असे प्रकार नवीन नाहीत. माजी महापौरपद भूषविलेल्या एका नेत्याच्या प्रभागात 10 वर्षांपूर्वी असेच ठिकठिकाणी लिंबू, मिरची अडकविण्याचे प्रकार घडल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे. त्याच प्रकारचा जादूटोणा, करणी असे प्रकार निवडणुकीत पुन्हा पाहावयास मिळू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.