फवारणीने दोन शेतमजूरांच्या डोळ्याला गंभीर दुखापत, उपचारासाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 05:55 PM2017-10-08T17:55:47+5:302017-10-08T17:56:05+5:30
समुद्रपूर तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे.
वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील उबदा येथे कपाशीवर फवारणी करताना दोन शेतमजूरांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी पैसे नसल्याने आर्थिक मदतीसाठी वणवण होत आहे.
तालुक्यात सोयाबीन व कपाशी फवारणी करताना आतापर्यंत पन्नासच्या वर शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा झाली आहे . उबदा येथील नितेश नामदेव शेटये ( वय ३२ ) हा शंकर फुलझेले यांच्या शेतात फवारणीसाठी गेला होता . फवारणी करताना अचानक डोळ्याला पाणी येण्यास सुरूवात झाली. थोडयावेळाने डोळे दूखू व अंधूक दिसायला लागले. हिंगणघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार करिता गेला असता त्याला सेवाग्रामला उपचाराकरिता जाण्यास सांगितले .सेवाग्राम रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याला भरती होण्याकरिता सांगितले पण पुढील उपचाराकरिता पैसेच नसल्याने तो गावाकडे परत आला . मागिल तीन दिवसांपासून पैशासाठी वणवण फिरूनही हाती पैसे आले नाही . मजूरीसुद्धा बंद आहे . आई वडील यवतमाळ जिल्ह्यात राहतात.त्यामुळे त्याच्या समोर पैशाचा गंभीर प्रसंग उभा झाला आहे. डोळ्यांचा त्रास वाढल्याने त्याची चिंता अधिकच वाढली असून डोळे निकामी होण्याची शक्यता आहे . शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे . भारत नाना उके वय ३३ ह्यालाही फवारणी करून आल्यावर डोळ्यात पाणी येणे व डोळ्यात प्रचंड वेदना होणे सुरु झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. ह्याच गावातील दोन शेतमजूरांना सुद्धा फवारणीतून विषबाधा झाली होती . पण उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली आहे .तालुक्यातील समुद्रपूर ,गिरड ,कोरा परिसरात अशाच स्वरूपाच्या पन्नास वर घटना झाल्याने व उबदा येथील शेतमजूरांचे डोळ्यांनाच विषबाधा झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.