शेतकरी बंदला मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: June 6, 2017 01:52 AM2017-06-06T01:52:41+5:302017-06-06T01:52:41+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमी भाव द्यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव मावळ : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला हमी भाव द्यावा, आदी मागण्यांसाठी शेतकरी संपांतर्गत सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मावळ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. लोणावळा, वडगाव मावळ, पवनानगर सारख्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. तेथील बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भाजपा वगळता सर्व पक्षीयांचा बंदला पाठिंबा दिसत होता. ग्रामीण भागातही शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त करत होते. मात्र, तळेगाव दाभाडे, कामशेतसह काही ठिकाणी बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. तेथील व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे दिसत होते.
लोणावळ्यात व्यापाऱ्यांचा पाठिंबा
लोणावळा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहरात कडकडीत बंद पाळत पाठिंबा दिला. लोणावळा शहर कॉँग्रेस कमिटी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपाला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नारायण आंबेकर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू बोराटी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेश सदस्य दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, नगरसेवक निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, संजय घोणे, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुर्वणा अकोलकर, बाळासाहेब कडू, विलास बडेकर, नारायण पाळेकर, बाळासाहेब लोखंडे, जीवन गायकवाड, विलास विकारी, दादा दफळ, डॉ. वैशाली चिंतामणी, अरुणा लोखंडे, सुनील मोगरे, फिरोज बागवान, शिवराज मावकर, वसंत भांगरे, सुबोध खंडेलवाल, रवींद्र कडू, प्रकाश गवळी, दीपाली गवळी, शीला बनकर, श्वेता वर्तक, रवी सलोजा, ज्ञानेश्वर येवले, संजय थोरवे, राजेश मेहता, दत्तात्रय गोसावी, सनी पाळेकर, परशुराम शिर्के, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजीमहाराज चौकात एकत्र जमत भाजपा सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, अशी मागणी करण्यात आली. लोणावळा टपरी, हातगाडी व पथारी संघटना तसेच विविध संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास आगामी काळात रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. बंददरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांनी चौकांमध्ये कडक बंदोबस्त तैनात केला होता.
शिवसेना सहभागी
बंदला पाठिंबा देण्यासाठी लोणावळा शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणावळा बंदला शिवसेनेने देखील जाहीर पाठिंबा दिला असून, शिवसेना बंदमध्ये सहभागी असल्याचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी सांगितले.
वडगावात कडकडीत बंद
वडगाव मावळ : सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ऐतिहासिक संपातील महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत वडगावमधील नागरिकांनी गावात कडकडीत बंद पाळला. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत दुग्धव्यवसाय करणारे नागरिक असल्याने दूध व्यवसायालाही मोठा फटका बसला. दूध संकलनही ठप्प झाले. फळ, भाजी मंडईच्या व्यवहारावरही मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे भाज्याच्या दरात वाढ झाली आहे. नागरिकांनी स्वस्फूर्तीने आपली दुकाने या वेळी बंद ठेवली असल्याने वडगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी पाठिंबा देण्यासाठी वडगाव शहरात व्यापाऱ्यांना बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला व्यावसायिक, नागरिकांनी साथ दिली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. शेतीमालाला हमीभाव मिळावा. ६० वर्षावरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संप पुकारला आहे.
सुदुंबरे येथे पदयात्रा
तळेगाव दाभाडे : सुदुंबरे गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी सकाळी पदयात्रा काढून बंदचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सिद्धेश्वर मंदिराच्या पटांगणात सभा झाली. या वेळी माजी सरपंच माणिक गाडे, तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जालिंदर गाडे, प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय केशव गाडे आदींची भाषणे झाली. शेतीमालाला हमीभाव आणि सुब्रह्मण्यम कमिटीचा अहवालातील तरतुदींची शेतकऱ्यांची मागणी रास्त असून ती शासनाने त्वरित मान्य करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे, माजी उपसरपंच मोहन काळडोके, नानासाहेब दरेकर, पोपट दिवेकर, माजी चेअरमन सोपान गाडे, बापूसाहेब दरेकर, सुखदेव गाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ते शेतकरी गेले कोठे?
पवनानदी बंदिस्त पाईपलाईनला टोकाचा विरोध करून राज्यभर रान उठवून देणाऱ्या संघटनांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दिल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. तळेगाव आणि परिसरातील किसान संघटना आणि राजकीय नेत्यांनी पवनानदी बंदिस्त पाईपलाईनला टोकाचा विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन केल्याचा दावा करणारे आता कोठे गेले आहेत?, असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. तळेगाव शहर परिसरात सर्व व्यवहार सुरळीत होते. नगर परिषद कार्यालय, शासकीय कार्यालये, बाजारपेठा, वित्तीय संस्था आदींचे नित्याचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.
देहूरोड भाजी मंडईत तुरळक गर्दी
देहूरोड : देहूरोड बाजारपेठ दर सोमवारी बंद राहत असल्याने सोमवारी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा कोणताही परिणाम देहूरोड- किवळे परिसरात जाणवला नाही. मात्र देहूरोडची भाजी मंडई सुरु ठेऊनही मंडईत ग्राहकांची खूपच तुरळक गर्दी होती. सोमवारच्या तुलनेत मंडईत रविवारी ग्राहकांनी चांगली गर्दी केली होती.
पवनानगर बाजारपेठेत शुकशुकाट
काले : येथील बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट होता. संपातील शेतकऱ्यांनी दिवसभरासाठी पिंपरी-चिंचवडला होणारा पाणी पुरवठा बंद करण्याचे निवेदन शाखाधिकारी मनोहर खाडे यांना दिले. राष्ट्रवादी पवन मावळ अध्यक्ष ज्ञानेश्वर निंबळे, ओ.बी.सी. सेल तालुकाध्यक्ष माऊली आढाव, जिल्हा सरचिटणीस संजय मोहोळ, शिवसेना विभागप्रमुख अमित कुंभार, ज्ञानेश्वर गोणते, रमेश कालेकर, सुनिल निंबळे, बबन ठुले, मनसेचे शशिकांत थोरात, मंगेश कालेकर आदी उपस्थित होते.
कामशेतमध्ये नेहमीप्रमाणे भरला अर्धा आठवडे बाजार
कामशेत : महाराष्ट्र बंदला कामशेत शहरात प्रतिसाद मिळाला नाही. सोमवारी कामशेत शहरातील बाजारपेठ सुरू होती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याचे जाहीर केले होते. या बंदला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद भेटला असला, तरी कामशेत शहरात मात्र सर्वच बाजारपेठ सुरू होती. त्यामुळे आपल्या भागात शेतकरी नाहीत का, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारात होते. कामशेत बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. अनेकांना संपाविषयी विचारणा केली असता, आपल्या ग्रामीण भागात संपाचे वारे अजून पोहोचले नाही अशी उत्तरे मिळत होती.
दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भरणारा आठवडे बाजार हा सोमवारच्या दिवशीही अर्धा भरलेला असतो. या आठवडे बाजारात पंचक्रोशीतील भाजीविक्रेते व थेट शेतमाल विक्री करणारे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येतात. कामशेतसह आजूबाजूचे नागरिक भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. सोमवारी शेतकरी संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याचे जाहीर केले होते. पण शहरातील सोमवारी भरणारा अर्धा आठवडे बाजार मात्र सुरु होता. अनेक भाजी विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे दुकाने थाटली होती. नागरिकही भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असल्याचे चित्र दिसत होते.
राजकीय द्वेषापोटी गालबोट लावण्याचा प्रयत्न : संजय भेगडे
तळेगाव दाभाडे : राज्यातील शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. भाजपा शासनाची भूमिका सकारात्मक आहे. परंतु, काही मंडळी राजकीय द्वेषापोटी आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे यांनी केले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाबाबत मावळ तालुक्यातून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार भेगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या सुमारे ८० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने शेतमालाच्या हमी भावाबाबत उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय ऐतिहासिक आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी व थकीत वीजबिलात माफी, दूध उत्पादकांनादेखील चांगला भाव देण्यासारखे निर्णय घेतले आहेत. राज्यासह मावळातील शेतकऱ्यांनादेखील या निर्णयामुळे न्याय मिळणार आहे. परंतु, त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळू नये आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही जण राजकीय द्वेषापोटी या आंदोलनात भर घालत आहेत.
संपास तळेगाव शहरातून नाममात्र प्रतिसाद तर परिसरातील ग्रामीण भागातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तळेगाव दाभाडे नगरपालिका आणि पंचायत समितीवर सत्ताधारी भाजपाचे निर्विवाद वर्चस्व आहे. तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे यांनी शेतकऱ्यांच्या संपास संपूर्ण विनाशर्त पाठिंबा असल्याचे प्रसिद्धिपत्राद्वारे कळविले आहे. सुदुंबरे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. इंदोरी, माळवाडी आणि परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पवनानगरात दूध ओतून शासनाचा निषेध
काले : महाराष्ट्र बंदला पवनानगर परिसर आणि बाजारपेठेत चांगला प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये स्थानिक शेतकरी, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पवनानगर चौकात शेतकऱ्यांनी दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी केली.
भारतीय किसान सभेचा पाठिंबा
देहूगाव : संपूर्ण कर्जमाफी व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव यासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या संपास पुणे जिल्हा भारतीय किसान संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी, दि. ७ जून रोजी पवनानगर येथील जलसिंचन विभागाच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मावळ, मुळशी, हवेली व खेड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्यासहविचार सभेचे आयोजन केले असल्याचे भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार यांनी सांगितले. बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द व्हावा, आंदोलनात शेतकऱ्यांवर भरलेले खटले मागे घ्यावेत, मावळ, मुळशी, हवेली, खेडमधील धरणग्रस्तांचे पुनर्वसन व इतर प्रश्न मार्गी लावावेत आदी मागण्यांवर चर्चा करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.