स्वा.सावरकर यांच्या जीवनावरील थ्रीडी शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: May 16, 2016 03:03 AM2016-05-16T03:03:42+5:302016-05-16T03:03:42+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘लाइट अँड साउंड शो’ प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने जागतिक दर्जाचे थ्रीडी मॅपिंग तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच उपयोगात आणून बनविण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ‘लाइट अँड साउंड शो’ प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या तंत्राने त्यांच्या प्रतिमेची व्यापकता स्मारकाच्या ६६ फूट उंच व ९६ फूट रुंद भिंतीवर अनुभवण्यासाठी सर्व वयोगटातील मंडळी सायंकाळी आठ वाजता स्मारकात एकच गर्दी करत आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हा नेत्रदीपक कार्यक्रम मुंबईत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करेल, तसेच तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख होईल, असा विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दृकश्राव्य व त्रिमित पद्धतीने स्मारकाच्या भिंतीवर साकारण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये प्रकाश व ध्वनीचा उपयोग करून स्वातंत्र्यवीर यांच्या क्रांतिकारी जीवनपटातील काही रोमहर्षक अंश सादर केले आहेत. स्मारकाच्या वतीने सर्व पातळ्यांवर कार्य करून त्यांचे विचार सर्व माध्यमातून प्रसारित व प्रचारित करण्याची ही मोहीम या पुढील काळातही कायम राहील, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सपत्नीक भेट देऊन हा कार्यक्रम पाहिला. नामवंत अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांनी अशा प्रकारचे तंत्र केवळ परदेशातच पाहिले असल्याचे सांगून, असा कार्यक्रम भारतात निर्माण होणे हे खरोखर कौतुकास्पद आहे व आपल्या मुलांसोबत हा आंतरराष्ट्रीय दजार्चा शो पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले. (प्रतिनिधी)