अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
By admin | Published: May 18, 2016 01:18 AM2016-05-18T01:18:12+5:302016-05-18T01:18:12+5:30
दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीत दुष्काळी आढावा बैठक झाली.
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीत दुष्काळी आढावा बैठक झाली.
दौंड तालुक्यातील सामान्य जनता दुष्काळाच्या भीषण परिस्थितीतीशी दोन हात करत असताना याबाबत शासनदरबारी सकारात्मक विचारांचा अभाव दिसून येतो. दौंड तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे या कामांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे खडकवासला कॅनॉलच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या गावात पाणी येऊनदेखील न दिल्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची खंत या वेळी महेश भागवत यांनी व्यक्त केली. रावणगाव येथे जलयुक्त शिवारबाबत कृषी विभागाच्या कामातील दिरंगाईची व्यथा उत्तम आटोळे यांनी मांडली. दौंड शुगरचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनीदेखील पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाच्या कामाबाबत आक्षेप घेतला. या बैठकीतदेखील पाटबंधाऱ्याचे अधिकारी उपस्थित नव्हते.
या वेळी रमेश थोरात, प्रदीप कंद, जालिंदर कामठे, आप्पासाहेब पवार, गुरमुख नारंग, सोहेल खान, बादशाह शेख, नितीन दोरगे, वैशाली नागवडे, रोहिणी पवार, आशा डेंबळकर, राजेश गायकवाड, प्रशांत धनवे, यांच्यासह दौंडचे विविध पदाधिकारी, तहसीलदार उत्तम दिघे, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
>सकारात्मक उत्तर मिळाले नाही
कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कामचुकारपणा चांगलाच भोवला. सुप्रिया सुळे यांनी जलयुक्त शिवारमधील कामाबाबत उपस्थित अधिकारी यांना जाब विचारला; मात्र यावर सकारात्मक उत्तर न आल्यामुळे बैठक सोडून जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावण्यास सांगितले. त्यामुळे थोडा वेळपर्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
>नक्की बैठकीत चाललंय काय?
दौंड तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात विविध गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी सहभागी झाले होते. मात्र नवीन तहसीलदार कार्यालयाच्या बैठक सभागृहामध्ये माईकची व्यवस्था नसल्यामुळे या बैठकीदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची व त्यावर अधिकारी वर्गातून मिळणाऱ्या उत्तराचा मेळ कुणालाच घालता आला नाही.