सुर्यनमस्काराची सक्ती रद्द होण्यासाठी सपाचे दबावतंत्र
By admin | Published: August 24, 2016 07:06 PM2016-08-24T19:06:33+5:302016-08-24T19:06:33+5:30
महापालिका शाळांमध्ये प्रार्थनेवेळी सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याच्या पालिका महासभेच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने आव्हान दिले आहे़
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - महापालिका शाळांमध्ये प्रार्थनेवेळी सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याच्या पालिका महासभेच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने आव्हान दिले आहे़ ही ठरावाची सुचना रद्द होऊन सुर्यनमस्कार व योगा शाळांमध्ये एच्छिक करण्यात यावा, यासाठी सपाचा दबावतंत्र सुरु आहे़ याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढ्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे़
योगगुरु रामदेव बाबा यांच्या पंतजली योग समितीमार्फत प्रत्येक महिन्यात योग साधनेचा कार्यक्रम ठेवण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण खात्याने मुंबईतील सर्व शाळांना दिले आहेत़ त्यानंतर लगेचच भाजपाने पालिकेच्या शाळांमध्येही योगा व सुर्यनमस्कार सक्तीचा करण्यासाठी हालचाली सुरु केल्या़ त्यानुसार भाजपाच्या समिता कांबळे यांची ठरावाची सुचना पालिकेच्या महासभेत बुधवारी मंजूर झाली़
या ठरावाच्या सुचनेवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता़ मात्र समाजवादी पक्षाने एक पाऊल पुढे टाकत याविरोधात जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे़ समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठविले आहे़ यामध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना योगा करणे वैकल्पिक करण्यात यावे, अशी मगणी केली आहे़ प्रतिनिधी
यासाठी सुरु आहे विरोध
महापालिका कार्यपद्धती विषयक नियमावली नियम १६ अन्वये धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी ठरावाची सुचना होऊ शकत नाही़ योग आणि सुर्यनमस्कार करणे ही एक धार्मिक क्रिया आहे़ योगासनाचे काही प्रकार मुस्लिम धर्मिय कधी करु शकत नाही़ सुर्यापुढे झुकण्यास सांगणे हे मुस्मिल धर्माच्या विरोधात आहे, असा आक्षेप समाजवादी पक्षाने घेतला आहे़