श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत

By admin | Published: April 20, 2017 07:08 AM2017-04-20T07:08:52+5:302017-04-20T07:08:52+5:30

स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत

Sri Sri Ravi Shankar National cultural envoy | श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत

श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत

Next

पुणे : स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत, तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.
या वेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत’चे विश्वास मोरे, अनिल सावळे, योगिराज प्रभुणे, चैत्राली देशमुख आणि पांडुरंग सांडभोर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गो-रक्षणासाठी काम करणारे उद्योजक व समाजसेवक अभय संचेती, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट, प्रयोगशिल शेतकरी संतोष बेलदरे, नगरसेविका अश्विनी कदम, आशा बिबवे यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
राजा माने यांनी
स्वागत केले. प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी राज्य मराठी संघाला
शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली. वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
फडणवीस म्हणाले, ‘‘सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा करणे हे आमचे कर्तव्य होते. त्याप्रमाणे हा कायदा करण्यात आला आहे. कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो; मात्र कर्जमाफी दिल्यानंतर, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळाला आहे. त्यात
आर्ट आॅफ लिव्हिंगने सर्वाधिक काम केले आहे.’’
बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’
सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले, तर समाजाचा विकास गतीने होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटत आहे. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.’’
रायकर म्हणाले, ‘‘राजकीय विरोधक आणि माध्यमांनीही व्यक्तिगत टीका कधी केली नाही हे फडणवीस यांचे वैशिष्ट्य आहे. पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर, त्यांनी कायदा मंजूर केला. ’’
(प्रतिनिधी)

Web Title: Sri Sri Ravi Shankar National cultural envoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.