श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:23 AM2024-10-07T11:23:00+5:302024-10-07T11:26:04+5:30
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी खिंडार पाडलं आहे. याठिकाणी ७ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी स्वगृही परतले आहेत.
मुंबई - एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्हावर दावा केला. त्या घडामोडीत शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. ठाणे, कल्याण डोंबिवली याठिकाणी ठाकरेंना मोठा फटका बसला. मात्र आता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून चर्चेत असलेले दीपेश म्हात्रे यांनी शिंदेंना सोडून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मातोश्रीवरील बैठकीत दीपेश म्हात्रे यांनी समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.
दीपेश म्हात्रे यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेतील ७ माजी नगरसेवक यांनीही स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या डोळ्यावर जी झापड होती ती दूर झाली ते चांगले. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेले या भ्रमाला अनेकजण भुलले, आता लोकांचे डोळे उघडले आहेत. ज्यांच्यासोबत तुम्ही गेला त्यांचे विचार महाराष्ट्र तोडण्याचे आणि विकण्याचे आहेत. हे बाळासाहेबांचे विचार कधीच असू शकत नाहीत. आपण स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही. एक दिवस जगायचे ते वाघासारखे जगा, अनेक शेळ्या आज भाजपाची गुलामगिरी करतायेत. तुम्ही थोडे आधीच निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी लोकसभेत गाडून टाकली असती असं म्हणत त्यांनी शिंदे पिता पुत्रांवर निशाणा साधला.
तसेच एकाबाजूला प्रचंड ताकद, पैसा, झुंडशाही असूनही आपल्याला जवळपास साडे चार लाख मते दिली. मुख्यमंत्र्यांचे कार्टे उभे होते. प्रचंड पैसा ओतला, सर्व यंत्रणा वापरली. सामान्य शिवसैनिकाला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिथे यावे लागले तरीही कल्याण डोंबिवलीकरांनी आपल्याला भरभरून मते दिली. कुठल्याही परिस्थिती जे शिवसेना संपवायला निघालेत त्यांना मी घेणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते दिशाभूल झाल्याने तिथे गेलेत त्यांना मी परत घेतोय. बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यावर मोहजाळ टाकून तिकडे खेचले गेले त्यांना पुन्हा शिवसेनेत घेऊन त्यांचे स्वागत करू. मात्र सत्तेची पदे, महामंडळे लोभाची पदे घेतलीत त्यांना पुन्हा घेणार नाही. भगव्याला गद्दारीचा डाग लावला तो धुवून भगव्याचे तेज मशालीनं उजळून घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील हा पहिलाच प्रवेश मातोश्रीच्या पायरीवर होतोय, पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व कार्यकर्ते मिळून करू. साम, दाम, दंड भेद सगळं करून पक्ष वाढवू. यातला एकही कार्यकर्ता कुठेही हलणार नाही हे आमचं वचन आहे. आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी आमच्यावर केसेस, गुन्हे दाखल करण्याचं काम केले गेले. महाराष्ट्र तोडण्याचं काम करणाऱ्यांना सोडून महाराष्ट्र जोडणाऱ्यांसोबत पुन्हा आलो आहे असं यावेळी दीपेश म्हात्रेंनी म्हटलं.
कोण आहे दीपेश म्हात्रे?
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात युवासेनेची स्थापना झाली. त्यात पहिल्या फळीत युवासेना ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून दीपेश म्हात्रे यांनी काम केले. कल्याण डोंबिवली महापालिकेत ते ३ टर्म नगरसेवक राहिलेत. त्याशिवाय केडीएमसीत ते स्थायी समितीचे सभापतीही होते. शिंदेंच्या बंडानंतर दीपेश म्हात्रे हे त्यांच्यासोबत गेले. त्याठिकाणी युवासेनेचे सचिव पद दीपेश यांना देण्यात आले होते. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत सातत्याने दीपेश म्हात्रे दिसायचे. शिंदेंचे विश्वासू शिलेदार म्हणूनही ते चर्चेत आले होते.