श्रीनिवास विनायक खळे स्मृतिदिन

By admin | Published: September 2, 2016 10:25 AM2016-09-02T10:25:48+5:302016-09-02T10:25:48+5:30

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज (२ सप्टेंबर) स्मृतीदिन.

Srinivas Vinayak Khale Memorial Day | श्रीनिवास विनायक खळे स्मृतिदिन

श्रीनिवास विनायक खळे स्मृतिदिन

Next
प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. २ -  ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज (२ सप्टेंबर) स्मृतीदिन.
३० एप्रिल १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली होती. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळेअण्णांनी जरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. भावगीतांव्यतिरिक्त ‘बोलकी बाहुली’, जिव्हाळा’, ‘पोरकी’, ‘पळसाला पाने तीन’ यासारख्या निवडक सहा मराठी चित्रपटांना खळेअण्णांनी संगीत दिले होते. तसेच लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी ह्या दिग्गजांना घेऊन त्यांनी ‘रामश्याम गुणगान’ हा गीतसमूह संगीतबद्ध केला होता.
 
जन्म आणि प्राथमिक संगीत शिक्षण
श्रीनिवास खळे ह्यांचा जन्म ३० एप्रिल, इ.स.१९२६ रोजी बडोदा येथे झाला. बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे अता हुसेन खाँ, निसार हुसेन खाँ आणि फैयाज हुसेन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांकडून त्यांना शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.
 
संगीतकार
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के. दत्ता (दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. बऱ्याच हालअपेष्टांनंतर इ.स. १९५२ साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील. ह्या दोन्ही रचना ग. दि. माडगूळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या. पण ऐन वेळी हा चित्रपट मूळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही. पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्हीकडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले. 
 
१ मे इ.स. १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत. हे गीत शाहीर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला व शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीतालादेखील आहे. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, हे गीतसुद्धा खूपच गाजले.
 
संगीत पाणिग्रहण ह्या प्रल्हाद केशव अत्रे लिखित संगीत नाटकाला खळ्यांनी संगीत दिले होते.
 
इ.स. १९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी इ.स. १९७३ साली ‘अभंग तुकयाचे’ हा संत तुकारामांच्याअभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडितभीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन जोशी यांच्या स्वरांत राम-श्याम गुणगान या नावाने एक भक्तिगीतांची तबकडी काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
 
खळे यांनी फारच थोड्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले. यंदा कर्तव्य आहे, बोलकी बाहुली, जिव्हाळा, पोरकी, सोबती ,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे...बोलकी बाहुलीतली (१) सांग मला रे सांग मला, आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला (२) देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला; जिव्हाळातले (१) लळा जिव्हाळा शब्दच खोटे (२) प्रिया तुज काय दिसे स्वप्नात, (३)या चिमण्यांनो परत फिरा रे (४) चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?
 
श्रीनिवास खळे यांनी फारशा चित्रपटांना संगीत दिलेले नसले तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळले आहेत. त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळजवळ १०० हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत. पंडित भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर,आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण पासून ते हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडित, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन ते अगदी लिटील चॅम्प आर्या आंबेकर यांच्यापर्यंत कैक नामवंतांनी खळेसाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाणी गायलेली आहेत. त्यांतली प्रसिद्ध गाणी: लता मंगेशकर यांनी गायलेले भेटी लागी जीवा अथवा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेसारखे तुकारामाचे अभंग; नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घननीळा बरसला सारखी मंगेश पाडगावकरांची भावगीते; भीमसेन जोशींनी गायलेले सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग; अथवा सुरेश फडके यांचे लळा जिव्हाळा शब्दच खोटे सारखे चित्रपटगीत; वसंतराव देशपांड्यांनी गायलेले बगळ्यांची माळ फुले, राहिले ओठातल्या ओठात वेडे; आशा भोसले यांचे कंठातच रुतल्या ताना, टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय ते पाहू. 
 २ सप्टेंबर २०११ साली त्यांचे निधन झाले. 
 
त्यांची गाजलेली अजून काही गीते पुढील प्रमाणे-
हृदयनाथ मंगेशकर
१) वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌ 
 
अरुण दाते/सुधा मल्होत्रा
१) शुक्रतारा मंद वारा २) हात तुझा हातातुन धुंद ही हवा
 
सुरेश वाडकर
१ )धरिला वृथा छंद २) जेव्हा तुझ्या बटांना
 
सुमन कल्याणपूर
१) उतरली सांज ही धरेवरी २) बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद.
 
पुरस्कार
इ.स. २०१० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ह्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
सूर सिंगार पुरस्कार (इ.स. १९७०)
लता मंगेशकर पुरस्कार (इ.स. १९९३)
जीवन गौरव पुरस्कार (इ.स. २००६)
संगीत रत्न पुरस्कार (इ.स. २००७)
पद्मभूषण (इ.स. २०१०)
स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार
सुधीर फडके पुरस्कार,
बालगंधर्व पुरस्कार
स्वररत्न पुरस्कार
दत्ता डावजेकर पुरस्कार
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

 

Web Title: Srinivas Vinayak Khale Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.