बीसीसीआयचे कार्य श्रीनिवासन यांच्या इशार्यावरच : अब्दी
By admin | Published: May 9, 2014 12:07 AM2014-05-09T00:07:01+5:302014-05-09T00:07:01+5:30
निलंबित राजस्थान क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान सुरू असलेला वाद आज आणखी चिघळला. आरसीएचे उपाध्यक्ष मोहम्मद अब्दी यांनी बीसीसीआयवर टीका केली.
नवी दिल्ली : निलंबित राजस्थान क्रिकेट संघटना आणि बीसीसीआय यांच्यादरम्यान सुरू असलेला वाद आज आणखी चिघळला. आरसीएचे उपाध्यक्ष मोहम्मद अब्दी यांनी बीसीसीआयवर टीका केली. मोदी यांच्यावर आजीवन बंदी असताना त्यांची आरसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे बीसीसीआयने आरसीएवर निलंबनाची कारवाई केली आणि नियमानुसार कार्य केल्याचा दावा केला, असे सांगताना देशात क्रिकेटचे संचालन करणार्या संस्थेची कारवाई आश्चर्यचकित करणारी असल्याचे मत अब्दी यांनी व्यक्त केले. आपीएल सट्टेबाजी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदापासून दूर जावे लागलेल्या एन. श्रीनिवासन यांच्यावर टीका करताना अब्दी म्हणाले, ‘बीसीसीआयचे कार्य अद्याप श्रीनिवासन यांच्याच इशार्यावर सुरू आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयच्या व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संघटनेवरील विश्वासावर प्रश्न उपस्थित झाला आहे. श्रीनिवासन यांच्यासाठी बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत अनेकदा नियमांमध्ये बदल केला आहे. बीसीसीआयमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींसाठी नियमही बदलले जातात. लोकतांत्रिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर केवळ ललित मोदी यांना रोखण्यासाठी आरसीए समितीला निलंबित करण्यात आले. बीसीसीआयचे निर्णय अद्याप श्रीनिवासन हेच घेत असल्याचे आरसीएवरील निलंबनाच्या कारवाईमुळे हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांची संस्थेवर पकड नसल्याचे दिसून येत आहे. शिवलाल यादव हे कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आहेत. प्रभारी अध्यक्ष असल्यामुळे यादव यांच्याकडे कुठल्या राज्य संघटनेला मान्यता देण्याचा किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार नाही. मान्यता देण्याचा आणि रद्द करण्याचा अधिकार आमसभेला आहे.’ (वृत्तसंस्था)
अब्दी म्हणाले, ‘बीसीसीआयची कारवाई अहंकार स्पष्ट करणारी असून देशातील कायदा व जनभावनेची उपेक्षा करणारी आहे. आरसीएवरील कारवाई घटनाविरोधी आहे. बीसीसीआयचा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयने संघटनेवर निलंबनाची कारवाई केली.’ -मोहम्मद अब्दी, आरसीएचे उपाध्यक्ष