‘एसआरपीएफ ग्रुप २’ शहरातील सर्वांत स्वच्छ भाग

By Admin | Published: October 3, 2016 01:42 AM2016-10-03T01:42:05+5:302016-10-03T01:42:34+5:30

महापालिकेने जाहीर केलेल्या स्पर्धेमध्ये प्रवेशिकाच येत नसल्याने चर्चेत आलेल्या स्वच्छता स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.

'SRPF Group 2' is the cleanest part of the city | ‘एसआरपीएफ ग्रुप २’ शहरातील सर्वांत स्वच्छ भाग

‘एसआरपीएफ ग्रुप २’ शहरातील सर्वांत स्वच्छ भाग

googlenewsNext


पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या स्पर्धेमध्ये प्रवेशिकाच येत नसल्याने चर्चेत आलेल्या स्वच्छता स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. शहरातील सर्वांत स्वच्छ सार्वजनिक क्षेत्र म्हणून ‘एसआरपीएफ ग्रुप भाग २’ याची निवड झाली आहे. त्याचबरोबर सर्वांत स्वच्छ सोसायटी म्हणून कुमार सबलाइम यांची, सर्वांत सुंदर खासगी संस्था म्हणून जीईई इंजिनियरिंग इंडिया यांची, सर्वांत सुंदर शाळा म्हणून मिलिनियम नॅशनल स्कूल, तर सुंदर स्वयंसेवी संस्था म्हणून शेल्टर असोसिएटची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता पुरस्कारांची योजना जाहीर करण्यात आली होती; मात्र मुदत संपत आली, तरी या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या नसल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. या स्पर्धेचा निकाल महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी जाहीर करण्यात आला. वेगवेगळ्या विभागातील १७ पारितोषिके या वेळी जाहीर करण्यात आली. विजेत्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना पहिल्या क्रमांकासाठी ५० हजार रोख, द्वितीय क्रमांक २५ हजार रोख व तृतीय क्रमांक १० हजार रोख व स्मृतिचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
वैयक्तिक पारितोषिकांमध्ये प्रथम क्रमांक किसनराव खेत्रे, द्वितीय अनिता तांबे, तृतीय शंकर वर्तक यांनी पटकाविले. खासगी संस्थांमध्ये पहिला क्रमांक जीईई इंजिनियरिंग इंडिया, द्वितीय क्रमांक मगरपट्टा टाऊनशिप, तृतीय क्रमांक विभागून जे. के. भोसले कॉर्पोरेशन लिमिटेड व अभिजित देशमुख यांनी पटकाविला.
सर्वांत सुंदर शाळा म्हणून मिलिनियम नॅशनल स्कूलची निवड करण्यात आली आहे. विमाननगरच्या सिम्बायोसिस कॅम्पसने द्वितीय क्रमांक, तर दादा गुजर शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सुंदर स्वयंसेवी संस्थेचा प्रथम क्रमांक शेल्टर असोसिएट, द्वितीय क्रमांक सागार मित्र, तर तृतीय क्रमांक द मुस्लिम फाऊंडेशनने पटकाविला. (प्रतिनिधी)

Web Title: 'SRPF Group 2' is the cleanest part of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.