एसआरपीएफच्या जवानांना साप्ताहिक सुट्टीही मिळेना
By admin | Published: April 24, 2016 03:04 AM2016-04-24T03:04:09+5:302016-04-24T03:04:09+5:30
एकीकडे पोलिसांची ड्युटी ८ तास करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना तब्बल २४ तास आॅनड्युटी असणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांना आठवड्याच्या
- मनीषा म्हात्रे, मुंबई
एकीकडे पोलिसांची ड्युटी ८ तास करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना तब्बल २४ तास आॅनड्युटी असणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) जवानांना आठवड्याच्या हक्काच्या सुट्टीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वर्षातील ३०७ दिवस आॅनड्युटी २४ तास असणाऱ्या या जवानांना यामुळे विविध शारीरिक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मानसिक संतुलन ढासळत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होत आहे.
दौंड येथील प्रशिक्षण केंद्रात १० किमीच्या धावण्याच्या प्रशिक्षणाच्या वेळी सतीश गुंडरे (रा. उदगीर, जि. लातूर) या २०११च्या बॅचच्या जवानाला तत्काळ उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य राखीव दलातील जवानांच्या आरोग्याचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे.
आपत्कालीन परिस्थिती, वेळोवेळी राज्यात ठेवण्यात येणारा बंदोबस्त, मोर्चे, सण सुरक्षेसाठी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलात १५ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण राज्यभर नेहमीच तत्पर असतो. पुणे, जालना, नागपूर, दौंड, धुळे, अमरावती, सोलापूर आणि मुंबई येथील १६ गटांमध्ये एसआरपीएफचे कामकाज चालते, तर यात आयआरबीचे (भारतीय राखीव बटालियन) तीन गट आहेत. मात्र, त्यांना स्वतंत्र जागा नसल्याने नागपूर, दौंड येथील गटांमध्ये ते कार्यरत आहेत. कोल्हापूर विभागालाही स्वतंत्र जागा नसल्याने त्यांचेही कामकाज दौंड गटातून चालते. एकीकडे ३६५ दिवसांपैकी ३०७ दिवस आॅनड्युटी २४ तास असतानाही या जवानांना साप्ताहिक सुट्टी घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बहुतांश जवान ग्रामीण भागातील असून, आठवड्यातून एकही दिवस सुट्टी मिळत नसल्याने त्यांना घरच्यांना भेटणे शक्य होत नाही.
बंदोबस्ताच्या ठिकाणी तासन्तास ताटकळत राहणे, तेथेच खाणे, झोपणे हा जणू त्यांचा दिनक्रम आहे. हे निमलष्करी दल
आहे, पण त्यांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याचे जवानांचे म्हणणे आहे. जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाचे तत्कालीन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय पाण्डेय यांनी फेसबुक पेज सुरू केले होते. त्याच्या माध्यमातून एकाच वेळी ४ हजार जवान जोडले गेले होते. आता
फेसबुक पेजही डीलिट करण्यात आले आहे. (पूर्वार्ध)
हक्काच्या सुट्टीसाठीही ‘लाच’
एखादा जवान साप्ताहिक सुट्टीवर आदल्या दिवसाच्या सायंकाळी ७ वाजल्यापासून गेला असेल, तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्याला ड्युटीवर हजर राहणे बंधनकारक करण्यात येते.
त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत कुटुंबाला भेटणे कसे शक्य आहे हे अधिकाऱ्यांनीच सांगावे, असा प्रश्न या जवानांनी उपस्थित केला आहे.
तथापि, मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत, या जवानांची साप्ताहिक सुट्टीही रद्द केली जाते. त्यामुळे सुट्टी हवी असल्यास चक्क ‘लाच’ द्यावी लागत असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
घरी जाऊ देत नाहीत... काही गटांमधील जवानांचे घर जवळपास असतानाही त्यांना घरी जाण्यापासून रोखले जाते. त्यामुळे आहे त्या दुरवस्थेतच त्यांना दिवस काढणे भाग पडते. अनेकांना घरभत्ताही दिला जात नाही. भत्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे अन्य एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. अनेक जवानांची वैद्यकीय बिलेही थकीत आहेत.
‘माझ्याकडे तक्रार नाही’
जवानांच्या सुट्टीबाबत माझ्याकडे कुठल्याही स्वरूपाची तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रारी आल्यास योग्य ती कारवाई करू.
- संदीप बिष्णोई, अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल