SSC Exam : दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध, राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 01:28 PM2023-02-04T13:28:33+5:302023-02-04T13:28:46+5:30
SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून, स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील छायाचित्र, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत, असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नमूद केले आहे.
वेळेबाबत संभ्रम नको
परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थी परीक्षागृहात उपस्थित असणे बंधनकारक आहे. त्यानंतर परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. या नियमानुसारच प्रवेशपत्रावरील वेळ आणि छापील वेळापत्रकातील वेळ यात तफावत दिसत आहे. मात्र, ती नियमानुसारच असून विद्यार्थ्यांनी स. १०.३०लाच उपस्थित रहायचे आहे.