SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ; वर्षा गायकवाड यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:18 PM2021-03-20T15:18:22+5:302021-03-20T15:21:03+5:30
ssc hsc exam 2021 - राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासाही दिला आहे.
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात (ssc hsc exam 2021) विद्यार्थी तसेच पालकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था होती. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासाही दिला आहे. आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल, असे जाहीर करण्यात आले आहे. (ssc hsc exam 2021 education minister varsha gaikwad announced that students to get half an hour more to write exam)
दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन या चर्चांना वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
Hats off to our students who have braved this tough academic year. To help them, here are some concessions and guidelines for the final exams. For FAQs, referhttps://t.co/KX9sqYrmnjpic.twitter.com/BX0873EFVM
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 20, 2021
परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ
दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जातो. मात्र, गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे, असे गायकवाड यांनी नमूद केले. तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटाच्या आधारे विद्यार्थी आणि पालक यांना लोकल मुभा देण्यात येणार आहे.
ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी
विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे निकष जैसे थे
कोरोना काळ असल्याने विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे निकष बदलले जाणार नाहीत. पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे गायकवाड सांगितले. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये करोनाची लक्षण आढळली आणि त्याला परीक्षा देता आली नाही, तर अशा विद्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ
दहावीच्या प्रात्याक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. बारावी विज्ञान शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांना पाच प्रयोग शिकवणार आणि त्यावर आधारित परीक्षा घेतली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे.