SSC Result 2020 : दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला; जाणून घ्या, 'मार्कांचा पाऊस' कसा पडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 12:13 PM2020-07-29T12:13:59+5:302020-07-29T12:29:29+5:30
SSC Result 2020 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं कारण समोर आलं आहे.
पुणे - राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (२९ जुलै) जाहीर झाला आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक ९८. ७७ टक्के निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी ९२.०० निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे.
यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळेच यावर्षी SSC चा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी निकाल जास्त लागला. राज्यात फक्त ५ टक्के मुलं नापास झाली आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.
दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण https://t.co/fl6PAvHoIi
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2020
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई ,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामूळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. मात्र, कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले.
राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी राज्याचा दहावीचा निकाल जाहीर केला. या प्रसंगी राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह ) पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला.
लय भारी! विद्यार्थिनींची दमदार कामगिरी, नासानेही दिला दुजोराhttps://t.co/lSp8s4svnW
— Lokmat (@MiLOKMAT) July 28, 2020
मागील वर्षी मार्च २०१९ मध्ये ८०: २० पॅटर्न रद्द करून सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती. परंतु , राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के असून कोकणनंतर विभाग कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यातील १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात
"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"
CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा
CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"
कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह'