Ssc Result 2020: हम भी है जोश मे..! दहावीच्या निकालात राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:40 PM2020-07-30T12:40:33+5:302020-07-30T12:45:04+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.७२ टक्के एवढा
पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. राज्यभरातील परीक्षा दिलेले एकुण ८ हजार ४५९ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ८४४ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९२.७२ टक्के एवढा आहे. तर वाढ खुंटलेले, थॅलेसिमिया, मज्जासंस्थेचा आजार, स्वमग्न या गटातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य शिक्षण मंडळाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा आधार घेत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. परीक्षेसाठी राज्यभरातून नोंदणी केलेल्या ८ हजार ५२२ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण २२ गटातील विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी अस्थिव्यंग गटामध्ये सर्वाधिक १८०५ विद्यार्थी होते. तसेच कर्णबधिर (१६७०), अध्ययन अक्षम (१५८८) व दृष्टीहीन (१२०३) या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. तर सर्वात कमी अॅसिड हल्ला झालेले व पार्किन्सन आजारातील गटात प्रत्येकी एक विद्यार्थी होता.
वाढ खुंटलेले (२९), थॅलेसेमिया/कॅन्सर (२८), मज्जासंस्थेचा आजार (२५), स्वमग्न (४९), हेमोफिलिया (२३) या गटात परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच सिकलसेल गटात परीक्षा दिलेल्या १२२ विद्यार्थ्यांपैकी १२१ विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. वाचा व भाषा अक्षमत्व या गटातील २६ विद्यार्थ्यांपैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता बारावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले होते.
-------------
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल -
विद्यार्थी। परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारी
दृष्टीहीन ११९० ११४३ ९६.०५
कर्णबधिर १६७० १४३८ ८६.१०
अस्थिव्यंग १८०५ १६६९ ९२.४६
बौध्दिक अक्षम ६४२ ५७८। ९०.०३
अध्ययन अक्षम १५८८ १५६१ ९८.२९
वाढ खुंटलेले २९ २९ १००
थॅलेसेमिया/कर्करोग २८ २८ १००
मज्जासंस्थेचा आजार २५ २५ १००
स्वमग्न ४९ ४९ १००
हेमोफिलिया २३ २३ १००
सिकलसेल १२२ १२१ ९९.१८
इतर १२८८ ११८० ९१.६१
--------------------------------------------------
एकुण ८४५९ ७८४४ ९२.७२
-------------------------------------------------