दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:14 AM2020-07-29T11:14:25+5:302020-07-29T11:49:07+5:30

राज्य शिक्षण मंडळाच्या दाहवीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

SSC result announced, 95.30 percent students pass in the state | दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

googlenewsNext

पुणे - राज्य शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, राज्यात राज्यात एकूण  ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षीच्या निकालांमध्येही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून, मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचा टक्का हा तीन टक्क्यांनी अधिक आहे. विभागवार निकालामध्ये कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल  ९८.७७ टक्के एवढा लागला आहे. सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून, या विभागात ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दरम्यान, यावर्षी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. 

महाराष्ट्र राज् माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी आज सकाळी दहावीचा निकाल जाहीर केला.  या प्रसंगी राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले उपस्थित होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्य मंडळातर्फे विद्यार्थांचा निकाल सर्वोत्तम पाच (बेस्ट ऑफ फाईव्ह ) पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्यातून एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९६.९१ टक्के एवढा लागला आहे. तर ९३.९९ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई ,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३  ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. कोरोनामूळे भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या.मात्र, कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले. 

मागील वर्षी मार्च २०१९ मध्ये ८०: २० पॅटर्न रद्द करून सर्व विषयांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकालाची टक्केवारी चांगलीच घसरली होती. परंतु , राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च २०२० मध्ये पुन्हा ८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी परीक्षा घेतल्यामुळे यंदा निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के असून कोकणनंतर विभाग कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्यातील १५ लाख  ८४ हजार  २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३  विद्यार्थ्यांपैकी १५ लाख  १ हजार  १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 

विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे 

पुणे - ९७.३४ टक्के
नागपूर - ९३.८४ टक्के
औरंगाबाद - ९२ टक्के
मुंबई - ९६.७२ टक्के
कोल्हापूर - ९७.६४टक्के
अमरावती - ९५.१४टक्के
नाशिक - ९३.७३ टक्के
लातूर - ९३.०९ टक्के
कोकण - ९८.७७टक्के

दरम्यान, आज दुपारी  दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.

दहावीचा निकाल कसा पाहू शकता?

www.maharesult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

या वेबसाईटवर निकाल पाहू शकता,तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाईल. कोरोनामुळे दहावीचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाला असला तरी 29 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना www mahresult.in , www.sscresult.mkcl.org किंवा www.maharashtra education.com या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: SSC result announced, 95.30 percent students pass in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.