एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला!

By admin | Published: July 13, 2017 05:31 AM2017-07-13T05:31:27+5:302017-07-13T05:31:27+5:30

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने, वारी विशेष एसटी सेवा देण्यात आली होती.

ST administration got Vitthal! | एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला!

एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने, वारी विशेष एसटी सेवा देण्यात आली होती. या सेवेमुळे एसटी प्रशासनाला तब्बल १६.५२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी याच काळात १३ कोटी रुपये कमविले होते. यंदा आकड्यात वाढ होऊन प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. यामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी प्रशासनाला विठ्ठल पावल्याची चर्चा एसटी वर्तुळात आहे.
आषाढी वारीनिमित्त राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकदेखील विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले होते. भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने पंढरपूर येथील मूळ स्थानकावरून, काही अंतरावर तात्पुरते स्वरूपाचे बस स्थानक उभारले होते. ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत ३ हजार ५२७ वारी विशेष एसटीचे १६ हजार ३०७ फेऱ्या चालविण्यात आल्या. या फेरीतून एसटी प्रशासनाला तब्बल १६ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. वारी विशेष सेवेचा ७ लाख ३१ हजार ८०६ प्रवाशांनी लाभ घेतला. गतवर्षी एसटी प्रशासनाने वारी विशेष सेवेतून १३ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.
प्रवासी-भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने, ५०० प्रवासी मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली होती. यामुळेदेखील उत्पन्न वाढीला फायदा झाल्याचे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शिवाय प्रशासनाच्या वतीने तात्पुरत्या बस स्थानकावर वारकरी माहिती कक्ष, प्रसाधनगृह, वैद्यकीय मदत केंद्र आणि एसटी चालक-वाहकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची विश्रामगृहे उभारण्यात आली असल्याची माहिती, एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: ST administration got Vitthal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.