गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज; सिंधुदुर्गात 350 गाड्या येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:15 PM2017-08-18T15:15:07+5:302017-08-18T15:21:04+5:30
कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे.
- सुधीर राणे
कणकवली, दि. 18- कोकणातील महत्वपूर्ण अशा गणेशोत्सवासाठी एसटी प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईतून रायगड,रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2216 गाड्या येणार असून त्यापैकी सुमारे 350 गाड्या सिंधुदुर्गात दाखल होतील. तर भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठीही व्यवस्था करण्यात आली असून गाडयांचे ऑनलाइन बुकिंग सुरु झालं आहे.
रेल्वे स्थानक ते बसस्थानक अशा ही गाड्या सोडण्यात येणार असून रेल्वे स्थानकात एसटीसाठी वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु होणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत असल्याचं एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गणेशोत्सवात मुंबई तसंच पुणे स्थित अनेक नागरिक आपल्या मूळ गावी येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीने नियोजन केलं आहे. मुंबईच्या विविध भागातून सुमारे 350 गाड्या सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या कालावधीत येतील. त्यांचे ऑनलाइन बुकिंग तिकडेच होत असल्याने त्याबाबत अधिक माहिती गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्यानंतरच मिळत असते. तरीही दरवर्षी येणाऱ्या गाड्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात आलं आहे.
भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभाग पातळीवर नियोजन करण्यात आलं आहे. सिंधुदुर्गात आलेल्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी मागणीनुसार गाडयांचे आरक्षण करून त्या सोडण्यात येतील. ऑनलाइन आरक्षणा बरोबरच तत्काळ आरक्षणाची सोय ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रेल्वेस्थानकावरुन बसस्थानक किंवा प्रवासी उपलब्धतेनुसार गावपातळीवर त्यांना पोहचविण्याच्या व्यवस्थेबाबत नियोजन करण्यात येणार आहे. कणकवली, कुडाळ,सावंतवाडी या रेल्वेस्थानकात एसटीचा वाहतूक नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याठिकाणी असलेले वाहतूक नियंत्रक रेल्वेबाबत घोषणा झाल्यावर बसस्थानकात दूरध्वनीद्वारे संपर्क करून आवश्यकतेनुसार गाड्या मागविणार आहेत. अवघ्या 10 मिनिटांत या गाड्या रेल्वे स्थानकात पोहचतील, असं नियोजन करण्यात आलं आहे. परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या गाड्या साधारणतः दुपारनंतर मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मुंबई सेंट्रल,ठाणे,बोरीवली या भागातून जास्त गाडयांचे आरक्षण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बसस्थानकांबरोबरच स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याकड़े कटाक्ष ठेवण्यात येणार आहे. बंद पडलेल्या गाड्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी दुरुस्ती पथके ही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील तळेरे येथे एस.टी.चे चेकपोस्ट 22 ते 25 ऑगस्ट या कालावधीत 24 तास सुरु असणार आहे. त्याचप्रमाणे राजापुर ते बांदा या परिसरात फिरते दुरुस्ती पथक कार्यान्वित असणार आहे. क्रेनही उपलब्ध रहाणार आहे. दिवसरात्र मार्ग तपासणी पथक कार्यरत असणार असून ते फक्त टिकट तपासणी न करता प्रवाशांना मार्गदर्शन करणार आहे.
21 ते 25 ऑगस्ट या कालावधीत मुंबईच्या विविध भागातून सिंधुदुर्गात प्रवाशांना येता यावे यासाठी हंगामी गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मागणी नुसार या गाड्याचा कालावधी पुढे वाढविण्यात येणार आहे. कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाड़ी, पणजी याठिकाणी प्रवाशांना एस.टी.चे तिकीट बुकिंग करताना स्वाईप मशीनद्वारे तिकीटाची किंमत जमा करता येणार आहे.
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी सावंतवाड़ी ते बोरीवली, मुंबई, कुडाळ ते बोरीवली, कणकवली ते ठाणे, मुंबई, बोरीवली, फोंडा ते बोरीवली, देवगड ते ठाणे मार्गे कुर्ला, देवगड नाटे मार्गे मुंबई, विजयदुर्ग बोरीवली, मालवण ते पुणे- निगडी, अर्नाळा , ठाणे,कल्याण अशा एस.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार असून प्रवाशांचा ओघ बघुन इतर एस.टी.आगारातूनहि गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय विजयदुर्ग मुंबई, कणकवली बोरीवली, देवगड बोरीवली, मालवण मुंबई अशा नियमित गाड्याही सुरु आहेत.त्यामुळे भाविकाना त्याचा लाभ घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठीही एसटी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
23 ऑगस्ट रोजी कोकणात सर्वाधिक गाड्या!
श्री गणेश चतुर्थी 25 ऑगस्ट रोजी असून त्यानिमित्ताने मुंबईच्या विविध भागातून कोकणात 23 ऑगस्ट रोजी सर्वाधिक म्हणजे 1242 गाड्या भाविकाना घेवून येणार आहेत.