एसटीची वातानुकूलित शिवनेरी बस उत्पन्नातही ‘सुसाट’
By admin | Published: June 24, 2016 04:52 AM2016-06-24T04:52:46+5:302016-06-24T04:52:46+5:30
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसी शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास बराच कालावधी लागला
सुशांत मोरे, मुंबई
एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी एसी शिवनेरी सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास बराच कालावधी लागला. मात्र, फक्त एसी सेवा असलेल्या आणि अन्य कोणत्याही सुविधा नसलेल्या याच सेवेने एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार वर्षांत तर शिवनेरीने दिलेल्या सर्वोत्तम सेवेमुळे जवळपास ३६ कोटींची वाढ उत्पन्नात झाली आहे. शिवनेरी बसला मिळणारा प्रतिसाद पाहता, आणखी काही सेवा सुरू करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे.
एसटी महामंडळाकडून लाल डबा बस, निमआराम बसबरोबरच मिडी बस चालवण्यात येत होत्या. या सेवांबरोबरच प्रवाशांना आणखी दर्जेदार सेवा देण्यासाठी २00२ साली दादर ते पुणे मार्गावर एसटी महामंडळाने पहिली एसी शिवनेरी बस सेवा सुरू केली. शिवनेरी सुरू करताच, ती सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास थोडा कालावधी लागला. मात्र, विना अपघात सर्वोत्तम सेवा देत असल्याने आणि मुंबई-पुणेदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्यांनाही ती सोईस्कर वाटत असल्याने, त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कालांतराने शिवनेरी सेवा अन्य मार्गांवरही सुरू करण्यात आली. फक्त एसी सेवा असणारी आणि त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही सुविधा नसणाऱ्या शिवनेरीने मात्र, महामंडळाला चांगले उत्पन्न देण्यास सुरुवात केली आहे. २0१२-१३ साली ११२ कोटी ४७ लाख रुपये उत्पन्न शिवनेरी सेवेतून महामंडळाला मिळाले होते. २0१५-१६ साली हेच उत्पन्न १४८ कोटी ७२ लाख एवढे झाल्याचे एसटीतील अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. उत्पन्नात जवळपास ३६ कोटी २५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. अन्य खासगी एसी बसमध्ये असणाऱ्या वाय-फाय सुविधांप्रमाणे शिवनेरीत वाय-फायसारखी सुविधा नाही. त्याचप्रमाणे, सीसीटीव्ही आणि व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिमही नाही. मात्र, वेळेवर आणि विनाअपघात प्रवास देत असल्यानेच, प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते सांगली या मार्गांवर सेवा सुरू करण्याचा विचार महामंडळाकडून केला जात आहे.
या वर्षी शिवनेरीचे भारमान
६0 टक्के आहे. नफा ना तोटा तत्त्वावरही शिवनेरीचे भारमान पाहिले, तर ते सरासरी
44%
एवढे आहे. एसटीतील एकूणच चलनीय स्थितीत शिवनेरीचा वाटा हा एक टक्का असून, उत्पन्नात तो दोन टक्के वाटा आहे.