मृत्युपूर्वी त्यांनी वाचवले 20 प्रवाशांचे प्राण, लालपरीच्या चालकाचा अनोखा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:41 AM2023-12-01T09:41:27+5:302023-12-01T09:41:53+5:30
Hingoli News: बस चालू असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अशाही परिस्थितीत चालकाने स्वत:ला सावरत अगोदर बस सुरक्षित कडेला उभी केली आणि स्टिरिंगवरच प्राण सोडला.
हिंगोली - बस चालू असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. परंतु अशाही परिस्थितीत चालकाने स्वत:ला सावरत अगोदर बस सुरक्षित कडेला उभी केली आणि स्टिरिंगवरच प्राण सोडला. आपला प्राण जाण्यापूर्वी त्याने बसमधील १५ ते २० प्रवाशांच्या जीवाची काळजी घेत लालपरीला अखेरचा निरोप दिला. ही घटना सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. मारोती हनुमंत नेमाणे (वय ५४, रा. संतुक पिंपरी) असे मयत चालकाचे नाव आहे.
एसटीच्या स्टिअरिंगवरच सोडला जीव
- हिंगोली आगाराचे चालक मारोती नेमाणे व वाहक रेखा चांदणे हे सकाळी ६ वाजता बस घेऊन हिंगोली ते धानोरा फेरीसाठी गेले होते. शालेय विद्यार्थिनींना घेऊन त्यांना शाळेत पोहोचविले. त्यानंतर धानोराहून ते हिंगोलीकडे निघाले. बसमध्ये १५ ते २० प्रवासी होते.
- सकाळी १० च्या सुमारास बस सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ आली असता चालक नेमाणे यांना अचानक छातीत त्रास सुरू झाला. काही कळण्याच्या आतच त्रास वाढला. परंतु, स्वत:ला सावरत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केली. त्यानंतर त्यांनी बसच्या स्टिअरिंगवरच डोके ठेवले. आणि जागीच प्राण सोडला.
- यावेळी वाहक रेखा चांदणे यांनी प्रवाशांच्या मदतीने चालक नेमाणे यांना तत्काळ हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात आणले. परंतु, या ठिकाणी डाॅक्टरांनी मारोती नेमाणे यांना मृत घोषित केले.
- घटनेची माहिती कळताच हिंगोली आगारप्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख यांनी रुग्णालयात धाव घेतली.