एसटी बस वळणावर उलटली
By admin | Published: October 21, 2014 04:36 AM2014-10-21T04:36:00+5:302014-10-21T04:36:00+5:30
ठाणे ते बोरिवली भरधाव निघालेली एसटी बस कारला ओव्हरटेक करून वळण घेताना अचानक उलटली. बसचालक आणि वाहकासह पाच प्रवासी जखमी
घोडबंदर - ठाणे ते बोरिवली भरधाव निघालेली एसटी बस कारला ओव्हरटेक करून वळण घेताना अचानक उलटली. बसचालक आणि वाहकासह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. अपघात कोणाच्याही जीवावर बेतला नाही, मात्र त्यामुळे घोडबंदर रोडवर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
चालक अर्जुन सूर्यवंशी, वाहक टी. आर. मोखाडे आणि पारस बिरारी, कादरखान सुलेमानखान आणि
मेघा परब अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. मोखाडे वगळता उर्वरित चौघांनाही ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेघा परब यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळाची ठाणे आगाराची एमएच १२ ईएफ-६६५४ ही ठाणे-बोरिवली एसटी बस दुपारी २.१०ला ठाण्याहून बोरिवलीकडे निघाली होती. घोडबंदर रोडवरील गायमुख मंदिराजवळच्या एका अवघड वळणावर कारला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली.
कासारवडवली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. वालझडे अधिक तपास करत आहेत. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)