एसटी आता बस कर! तिकीट तर नाहीच अन् पैसेही गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 05:39 AM2023-05-21T05:39:15+5:302023-05-21T05:39:25+5:30
विविध मार्गावर बसफेऱ्यांसाठी मागणी असली, तरी काही ठिकाणी गाड्या उपलब्ध नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांच्या मागणीनुसार सर्व आगारातून राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये या जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र शुक्रवारपासून एसटीच्या ऑनलाईन तिकीट आरक्षणाचा गोंधळ सुरू आहे. ऑनलाईन आरक्षण करताना तिकीट बुकिंग होत नाही, मात्र खात्यातून पैसे कपात होत आहेत.
विविध मार्गावर बसफेऱ्यांसाठी मागणी असली, तरी काही ठिकाणी गाड्या उपलब्ध नाहीत. यामुळे नफ्याच्या मार्गावरच अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत फेऱ्या कमी आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उत्पन्नात वाढ करण्याची एसटीला संधी असते. मात्र, महामंडळाकडे बसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे मागणी असताना फेऱ्या उपलब्ध करून देण्यात अडचणी आहेत. ऑनलाईन तिकीट आरक्षण करताना गोंधळ उडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मी मुंबई ते पुणे एसटीचे ऑनलाईन तिकीट आरक्षित करत होतो. परंतु तिकीट आरक्षित झाले नाही. काही वेळाने मला खात्यातून तिकिटाचे पैसे कपात झाल्याचा मेसेज आला.
- सुभाष साळवे, प्रवासी