ST Bus: एसटीचे सरकारकडे थकले ६०० कोटी, विविध २९ सवलतींचा परतावा अडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 07:39 AM2023-01-29T07:39:02+5:302023-01-29T07:39:29+5:30
ST Bus: एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध स्तरांतील नागरिकांना प्रवासात सवलती दिल्या जातात. या सवलती राज्य सरकारकडून मंजूर करून त्याचा परतावा एसटी महामंडळाला दिला जातो.
मुंबई : एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध स्तरांतील नागरिकांना प्रवासात सवलती दिल्या जातात. या सवलती राज्य सरकारकडून मंजूर करून त्याचा परतावा एसटी महामंडळाला दिला जातो. या सवलतींच्या परताव्यापोटी दिले जाणारे सुमारे ६०० कोटी रुपये सरकारकडे थकले आहेत. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती पाहता या पैशाची निकड आता महामंडळाला भासू लागली आहे.
एसटी महामंडळाकडून प्रवासात दिल्या जाणाऱ्या सवलतींमध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांचा सहप्रवासी, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ५ वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अपंग, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते, सिकल सेल, डायलेसिस रुग्ण आदींचा समावेश आहे. या सवलतींच्या प्रतिपूर्तीची रक्कम सरकार वर्षानुवर्षे करीत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही रक्कम थकली असून, २०२१ व २०२२ मधील एकूण ३८९ कोटी रुपये येणे बाकी आहे. एसटी सक्षम करण्यासाठी या रकमेची आवश्यकता असून, सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली.