‘भंगारा’तील एसटी बसची होणार पुनर्बांधणी
By admin | Published: August 27, 2016 05:14 AM2016-08-27T05:14:58+5:302016-08-27T05:14:58+5:30
एसटीकडून सवलतीच्या पासाची सुविधा दिली जात असतानाच आता आणखी एक नवी योजना एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी आणली जाणार आहे.
मुंबई : शाळा,महाविद्यालयांमध्ये जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटीकडून सवलतीच्या पासाची सुविधा दिली जात असतानाच आता आणखी एक नवी योजना एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी आणली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहलीसाठी एसटीच्या बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एसटीकडून भंगारात काढण्यात येणाऱ्या बसेसची पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाच्या सवलतीतील पासाची सुविधा सध्या शाळा व महाविद्यालयातील जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांना मिळत आहे. या विद्यार्थ्यांना पासात ६६ टक्के सवलत दिली जाते. याचा सर्वाधिक फायदा हा शहरी भागातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळतो. मात्र पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना बस स्थानक, आगार किंवा वाहतूक नियंत्रण कक्षावर जावे लागते. यात बराच वेळ खर्ची करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांची होणारी पायपीट थांबावी यासाठी महामंडळाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पास वितरित करण्याचा नुकताच निर्णय घेतला. त्यामुळे मोठा दिलासा विद्यार्थ्यांना मिळाला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहली जात असतात. त्या वेळी त्यांना एसटीच्या बस उपलब्ध केल्या जातात. मात्र सेवेत असलेल्या बसेस उपलब्ध करताना एसटीला मोठी अडचण निर्माण येते. शाळा, महाविद्यालयांची ही परवड थांबावी आणि विद्यार्थ्यांची सहलीनिमित्त सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी महामंडळाने एसटीच्याच बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
>दररवर्षी दोन हजार बस भंगारात
एसटीकडून वर्षाला जवळपास दोन हजार बसेस भंगारात काढल्या जातात. त्या पूर्णपणे मोडीत काढल्यानंतर तेवढ्याच बसेस नव्याने बांधून ताफ्यात दाखल करण्यात येतात. भंगारात काढण्यात येणाऱ्या बसेसची संख्या पाहता यातील काही बसेसची पुनर्बांधणी करून त्या विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी वापरात आणण्याचे नियोजन केले आहे.