खासगी बसेसच्या वाहतुकीने एसटीला फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2016 08:31 PM2016-10-24T20:31:05+5:302016-10-24T20:31:05+5:30
‘प्रवासी हेच दैवत’ मानलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारापुढे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स कंपनीने मोठे आव्हान उभे केले असून
dir="ltr">
रेवणसिद्ध जवळेकर / ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 -‘प्रवासी हेच दैवत’ मानलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारापुढे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स कंपनीने मोठे आव्हान उभे केले असून, खासगी लक्झरी बसेसच्या टप्पा वाहतुकीमुळे सोलापूर आगाराच्या प्रवासी उत्पन्नाला चांगलाच फटका बसत आहे. बस स्थानक परिसरात थांबलेल्या खासगी बसेसमध्ये प्रवाशांना जबरदस्तीने बसवण्यासाठी चालकांबरोबर त्यांच्या सोबतच्या मुलांची बस स्थानकात दादागिरी पाहावयास मिळत आहे. एस. टी. चे उत्पन्न वाढण्याबरोबर अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याचे खूप मोठे आव्हान सोलापूर आगारापुढे आहे.
‘गाव तिथे एस. टी’ अन् ‘सुरक्षित प्रवास-सुखकर प्रवास’ असे ब्रीद घेऊन निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जाताता. जिथे खासगी लक्झरी बस गाड्या जाऊ शकत नाही, तेथे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या हमखास पोहोचतात. शिवाजी चौकातील प्रमुख बस स्थानक परिसरात विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या लक्झरी बस प्रवाशांच्या प्रतिक्षेत थांबलेल्या असतात. अशा खासगी बसमध्ये प्रवाशांना जबरदस्तीने बसवले जाते. वेळप्रसंगी प्रवाशांना दमदाटीही केली जाते. याचा एकूणच फटका सोलापूर आगाराला बसत आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात मोहीम
अवैध प्रवासी वाहतुकीचा जोर वाढला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. गाड्यांनी प्रवास करणाºया प्रवाशांनाही रोखण्याचे काम खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या करीत आहेत. बस स्थानकात जाणाºया प्रवाशांबरोबर स्थानकात थांबलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी खास युवकांना नेमले आहेत. हे युवक कमिशनपोटी एस. टी. कडे जाणाºया प्रवाशांना जबरदस्तीने खासगी बस गाड्यांमध्ये बसवण्याचे काम करीत असतात. यामुळे एस. टी. चे उत्पन्न कमी होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, ग्रामीण पोलीस आणि सोलापूर आगार संयुक्तपणे मोहीम हाती घेऊन अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याचे काम करणार आहे. पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यासाठी एस. टी. ने प्रवास करा- जोशी
सुरक्षित अन् सुखकर प्रवास म्हणून राज्य परिवहन महामंडळाकडे पाहिले जाते. खासगी लक्झरी बस गाड्यांचे तिकीट दर कमी असले तरी त्यांच्याकडून प्रवाशांना सुरक्षेची हमी मिळत नाही. एखाद्या एस. टी. अपघात झाला तरी तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याची सोय केली जाते. जखमींना काही रक्कम तातडीने दिली जाते. याचा विचार करून प्रवाशांनी खासगी बस प्रवास टाळावा आणि एस. टी. गाड्यांनी प्रवास करावा, असे आवाहन सोलापूर आगाराने विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रवाशांना वेड्यात काढण्याचे काम
पांजरापोळ चौकात थांबलेल्या खासगी लक्झरी बस गाड्यांमध्ये प्रवाशांची भरणा केल्याशिवाय या गाड्या मार्गस्थ होत नाही. गाडी सुरु केली जाते. प्रवाशांना वाटते की आता सुरु झाला प्रवास. परंतु शिवाजी चौक, सम्राट चौक आणि पुढे पुणे नाक्याहून पुन्हा गाडी शिवाजी चौकात आणली जाते. त्यामुळे प्रवाशांना वेड्यात काढण्याचे काम खासगी लक्झरी बस चालक करीत असतात.
अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी सोलापूर आगाराने एक पाऊल पुढे टाकले आहे. पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि आरटीओ यांच्या सहकार्याने मोहीम हाती घेणार आहोत.
-श्रीनिवास जोशी
विभाग नियंत्रक- सोलापूर आगार
एस. टी. प्रवास हा सुरक्षित मानला जातो. विशेषत: महिला, वृद्ध आणि बालगोपाळांची काळजी चालक, वाहक घेत असतात. एस. टी. ने प्रवास करुन आनंद द्विगुणित करावा.
-मुकुंद दळवी
विभागीय अधीक्षक- सोलापूर आगार