एसटीच्या चालक- वाहकांना नवा गणवेश
By admin | Published: September 20, 2016 04:56 AM2016-09-20T04:56:45+5:302016-09-20T04:56:45+5:30
एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गणवेश डिझाइन ठरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एनआयएफटीशी बोलणी सुरू होती
मुंबई : एसटीच्या चालक, वाहकांसह यांत्रिकी विभागातील कामगारांसाठी गणवेश डिझाइन ठरवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून एनआयएफटीशी बोलणी सुरू होती. अखेर गणवेशाच्या डिझाइनवर एसटी महामंडळ आणि कामगार युनियनकडून सोमवारी झालेल्या सादरीकरणात शिक्कामोर्तब करण्यात आले. यात चालक-वाहकांसाठी खाकी रंगाच्या गणवेशाला अंतिम मंजुरी देण्यात आली. एसटीतील अधिकारी वर्गालाही गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी एनआयएफटीकडून खारघर येथील कार्यालयात गणवेशाच्या डिझाइनचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. या वेळी परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते, एसटी व्यवस्थापकीय संचालक रणजिंत सिंह देओल उपस्थित होते. एसटीतील विविध कामगारवर्गांचे प्रतिनिधीही राज्यातून आले होते.
चालक-वाहकांसाठी खाकी रंगाचा गणवेश असून त्यावर एसटीचा लोगो आणि त्यांचे नाव असेल. यांत्रिकी विभागांसाठीही गडद निळा आणि करड्या रंगाचा गणवेश ठरवण्यात आला आहे. हा गणवेश अग्निरोधक आहे. साहित्य ठेवण्याची सोयही या गणवेशात आहे. कामगारवर्गातील सर्वांचा गणवेश हा त्या-त्या पदांच्या दर्जानुसार असणार आहे. वरिष्ठ कामगारांसाठी गडद रंगाचा गणवेश असेल. त्याखालील स्तरावरील कामगारांसाठी फिकट रंगाचा गणवेश असेल. यामुळे प्रत्येक कर्मचारी पदानुसार ओळखता येईल. या वेळी अधिकारीवर्गासाठी गणवेश ठेवण्यावर निर्णय घेण्यात आला.
मात्र त्यांच्या गणवेशाच्या डिझाइनला अंतिम स्वरूप देण्यात आले
नाही. (प्रतिनिधी)
>अंधारातही चालक-वाहक ओळखता येणार
चालक-वाहकांच्या नव्या गणवेशांवर रेडियमच्या दोन
पट्ट्या असतील. म्हणजे मार्गावर असतानाच एखादी बस रस्त्यात बिघडल्यास किंवा अपघात झाल्यास रात्री-अपरात्री अन्य वाहनांच्या चालकांना अंधारातही
ते दिसू शकतील.
>६७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून गणवेश ठरवण्यात आला आहे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.