एसटी, मध्य रेल्वेला सुगीचे दिवस
By admin | Published: March 27, 2017 04:27 AM2017-03-27T04:27:52+5:302017-03-27T04:27:52+5:30
गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकलने फेब्रुवारी, मार्च महिन्यात मात्र चांगलीच आगेकूच केली आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या एसटीचे मार्च महिन्यात प्रवासी भारमान ५ टक्क्यांनी वाढले आहे. तर फेब्रुवारीपर्यंत मध्य रेल्वेचा वक्तशीरपणाही ९१ टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे एसटी व रेल्वेला सुगीचे दिवस आले की काय, असा प्रश्न पडला आहे.
प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांत फारसे न झालेले बदल आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता २0१२-१३ पासून ते आतापर्यंत जवळपास १६ कोटी प्रवासी कमी झाले. त्यामुळे प्रवासी व उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. तरीही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. मात्र एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
गेल्या वर्षी याच महिन्यात भारमान ५0.९८ टक्के होते. हे पाहता ५.७७ टक्के भारमानात वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यापर्यंत १३६ कोटी ४५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा याच महिन्यापर्यंत
१४७ कोटी ४८ लाखांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे.
महामंडळाचे प्रवासी भारमान वाढलेले असतानाच मध्य रेल्वेलाही सुगीचे दिवस आलेले आहेत. सिग्नल बिघाड, रुळाला तडा, ट्रेन रुळावरून घसरणे इत्यादी कारणांमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होत असते आणि वक्तशीरपणाची ऐशीतैशी होताना दिसते. परंतु फेब्रुवारी महिन्यात मध्य रेल्वेची लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वक्तशीरपणात चांगलीच सुधारणा झाली.
एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ९१.४ टक्के वक्तशीरपणा मध्य रेल्वेचा राहिला, तर त्याआधी जानेवारी महिन्यात ८८ टक्के वक्तशीरपणा होता. महत्त्वाची बाब म्हणजे
फेब्रुवारी महिन्यात सकाळी गर्दीच्या वेळी ९४ टक्के तर संध्याकाळी
गर्दीच्या वेळी ९0 टक्के वक्तशीरपणा होता, अशी माहिती देण्यात आली. आता मार्च महिना संपत आला असून या महिन्यात रेल्वेचा वक्तशीरपणा कसा राहील हे पाहण्यासारखे
असेल. (प्रतिनिधी)
एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.