एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:46 IST2025-01-22T11:45:06+5:302025-01-22T11:46:01+5:30

राज्य परिवहन विभागाने एसटी महामंडळाला भाड्याने बसेस घेण्याचा करार रद्द करण्यास आणि नवीन निविदा मागविण्यास सांगितले आहे.

ST contract bus tender cancelled CM Devendra Fadnavis orders to conduct fresh tender process | एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय

एसटीसाठी १३१० गाड्या घेण्याची निविदा रद्द; एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतला होता निर्णय

MSRTC Bus Tender: एसटी महामंडळासाठी १३१० बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे.  भाडेतत्त्वावर बस घेण्यासाठी नव्याने पारदर्शीपणे प्रक्रिया राबवण्याचे आदेश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत. निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहेरबानी दाखवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेला हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे.

राज्य परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला भाड्याने बसेस घेण्याचा करार रद्द करण्यास आणि नवीन निविदा मागविण्यास सांगितले आहे. परिवहन विभागाने एमएसआरटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात, जुना करार रद्द करून नवीन निविदा मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव (वाहतूक) संजय सेठी यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा करार रद्द करण्याची आणि नवीन निविदा मागवण्याची शिफारस केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

या समितीने एमएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांची आणि सल्लागार संस्थांची चौकशी करण्याची शिफारस केली आहे. ही योजना २,८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. गेल्या आठवड्यात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते असताना आणि शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्याकडे एमएसआरटीसीचे अध्यक्षपद असताना घेतलेल्या एमएसआरटीसीच्या निर्णयाला स्थगिती दिली. परिवहन विभागातील डेस्क ऑफिसर सारिका मांडे यांनी हा निर्णय रद्द करण्याचा आदेश जारी केला.

एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावर १३१० गाड्या घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. त्यासाठी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुदतवाढ तर याला विरोध करणाऱ्यांची बदली करण्यात आली होती. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या २१ विभागांसाठी विभागनिहाय निविदा प्रक्रिया राबवून १३१० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला फेब्रुवारी २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर निविदेतील अटी- शर्थीमध्ये बदल करण्यात आले.

नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. "सरकारने चौकशी अहवाल सार्वजनिक करावा. केवळ करार रद्द करणे पुरेसे नाही. हा घोटाळा एमएसआरटीसी अधिकारी-ठेकेदार-सल्लागार यांच्या संगनमताने होणार होता. त्यामुळे, या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा हा मुद्दा उपस्थित करेन. समितीचा अहवाल सार्वजनिक करावा अशी माझी मागणी आहे," असं अंबादास दानवे म्हणाले.

"डिसेंबर २०२४ मध्ये एमएसआरटीसीने बस भाड्याने घेण्यासाठी तीन कंपन्यांना इरादा पत्र दिले. १० वर्षांसाठी १,३१० बस भाड्याने देण्याची योजना होती. भाड्याचा खर्च प्रति किमी ३४.७० ते ३५.१० रुपये होता, परंतु त्यात इंधनाचा खर्च वगळण्यात आला होता. २०२२ मध्ये एमएसआरटीसीने इंधन खर्चासह प्रति किमी ४४ रुपये दराने बस भाड्याने घेतल्या होत्या. सरासरी इंधन खर्च प्रति किमी सुमारे २२ रुपये आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष बस भाड्याचा खर्च प्रति किमी ५६ रुपयांपेक्षा जास्त असेल, जो प्रति किमी सुमारे १२ ते १३ रुपये जास्त आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, एसटी महामंडळ १,३१० बसेस भाड्याने घेणार आहे. त्यापैकी ४५० बसेस मुंबई-पुणे कॉरिडॉरसाठी, ४३० बसेस नाशिक-छत्रपती संभाजीनगरसाठी आणि ४३० बसेस नागपूर-अमरावतीसाठी आहेत. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल टाइम मोबिलिटी इंडिया आणि अँटनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स यांनी बसेस पुरवण्याची ऑफर दिली होती.
 

Web Title: ST contract bus tender cancelled CM Devendra Fadnavis orders to conduct fresh tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.