एसटी महामंडळाला मिळणार ७०० नव्या गाड्या, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 01:41 AM2018-09-07T01:41:43+5:302018-09-07T01:42:03+5:30
राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे.
मुंबई : राज्याची जीवनवाहिनी असणा-या एसटीच्या ताफ्यात आता नव्या को-या सातशे बसेस दाखल होणार आहेत. नवीन बस खरेदीसाठी राज्य सरकारकडून महामंडळाला निधी देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली.
सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात अलीकडेच एक बैठक झाली. यावेळी एस.टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजिसिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. एसटीचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुरक्षित व्हावा यासाठी राज्य सरकार नवीन बसखरेदीसाठी निधी देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी १२.५ कोटींचा निधी नजीकच्या काळात दिला जाईल तर उर्वरित निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने ही पुढाकार घेऊन बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन ही मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
बैठकीत त्यांनी वर्धा, देवळी, सेलू, वडसा, गडचांदूर, कोरपना, नागभीड, चंद्रपूर, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गूस, भद्रावती, राजुरा, चिमूर बस स्थानकांच्या कामांचा ही आढावा घेतला. वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गुस, भद्रावती, राजुरा चिमूर बसस्थानकाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रूपर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांना ही गती देण्यात यावी, कंत्राटदारांना वेळेत आणि दर्जेदार काम करून घ्यावे, अशा सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सहा महिन्यात विठाई बस सेवा सुरू
५०० बस खरेदीसाठी महामंडळाला अर्थसहाय्य करावे तसेच पंढरपूर यात्रेदरम्यान ‘विठाई’ संकल्पनेवर आधारित २०० बससाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. त्यानूसार अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ७०० बस खरेदीसाठी अर्थ सहाय्य देण्याची तयारी दर्शवली आहे. १०० ते १५० किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी ‘विठाई’ योजनेखाली एसटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्र्व्हेेक्षणाचे काम सुरु असून सहा महिन्यात प्रत्यक्ष विठाई बस सेवा सुरू होईल.
महामंडळाच्या ताफ्यात सध्या १९ हजार एसटी बसेस आहेत. नुकत्याच महामंडळाने भाडेतत्वावर १५०० शिवशाही आणि स्वमालकीच्या ५०० शिवशाही बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी सुमारे ९०० बस एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत.