चालकांपुढे एसटी महामंडळ हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:16 AM2018-05-14T04:16:33+5:302018-05-14T04:16:33+5:30
एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून
महेश चेमटे
मुंबई : एसटी महामंडळाच्या वातानुकूलित ‘शिवशाहीच्या वाढत्या तक्रारी’ सध्या राज्यातील प्रवाशांच्या चर्चेचा विषय आहे. कंत्राटी शिवशाहीवरील चालक हा कंत्राटदाराचा असून, वाहक महामंडळाचा आहे. ‘खासगी’ चालकांकडून बेदरकारपणे आणि दारू पिऊन बस चालवण्याचा प्रकार घडतात. अशा चालकवर्गाच्या प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर महामंडळाला थेट कारवाई करण्याचे अधिकार नाही. यामुळे महामंडळाला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते. परिणामी, महामंडळ कंत्राटदाराच्या चालकांसमोर हतबल झाले असल्याचे चित्र आहे.
राज्यातील शिवशाहीचालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे अनेक प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणले आहेत. औरंगाबाद-चंद्रपूर शिवशाहीचा चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले, यावर महामंडळाने चालकाला ५० हजारांचा दंड आकारला. खासगी कंपनीने संबंधित चालकाला अन्य आगारात नियुक्त केले. तसेच ठाणे-दापोली शिवशाहीच्या मद्यधुंद चालकाला प्रवाशांनी हाकलवून लावले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेतत्त्वावरील खासगी वातानुकूलित शिवशाही राज्यभर धावत आहेत. कंत्राटी शिवशाही बसमध्ये चालक हा कंत्राटदारांचा असून, वाहक हा महामंडळाचा आहे. यामुळे चालकांच्या अरेरावीपुढे महामंडळ हतबल झाले आहे.
पुणे-नाशिक, औरंगाबाद-चांदूर, सावंतवाडी-पुणे, लातूर-औरंगाबाद, पुणे-अंबेजोगाई (टायर फुटून), नांदेड-लोहा शिवशाही थेट बसस्थानकावरील फलाटावर चढवल्यामुळे शिवशाहीला नुकसान, कोल्हापूर-स्वारगेट शिवशाही अपघातानंतर चालक बस घेऊन फरार, अशा प्रकारे राज्यातील बहुतांशी मार्गावरील शिवशाही काही महिन्यांच्या काळातच अपघातग्रस्त झाल्या आहेत.
मुख्यालयात माहिती उपलब्ध नाही
शिवशाहीबाबत तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याची मुभा आगार व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. प्रवाशांच्या तक्रारीनुसार आगार व्यवस्थापक कारवाई करत आहेत. कारवाईबाबत करारात योग्य तरतूद आहे. खासगी चालकाबाबत तक्रार आल्यास संबंधित चालकाला आगारातून काढण्याची कारवाई करण्यात येते. आगारातून कारवाई होत असल्यामुळे मुख्यालयाकडे केलेल्या कारवाईची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
- श्रीनिवास जोशी,
विभाग नियंत्रक, शिवशाही
प्रवासी ‘अ’सुरक्षिततेसाठी!
प्रवासी तक्रारीनुसार महामंडळ संबंधित कंत्राटदाराला केवळ नोटीस बजावते. नोटीस प्राप्त झाल्यानंतर, संबंधित चालकांची बदली या आगारातून त्या आगारात केली जाते. यामुळे महामंडळाच्या ‘प्रवासी सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याला धक्का लागल्याचे महामंडळातील ‘जुने-जाणते’ अधिकारी खासगीत मान्य करतात.