कोरोनाच्या लढाईत ‘तिचं’ योगदान न विसरण्यासारखं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:04 PM2020-06-01T16:04:54+5:302020-06-01T16:25:05+5:30
आजचा एसटीचा ७२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या विळख्यात साजरा करावा लागणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा थेट परिणाम एसटीवरही झाला आहे. रोजचं उत्पन्न घटलं. पण एसटीला लालडब्बा म्हणून हिणवणाऱ्या लोकांना पुन्हा एसटीचं सामाजिक काम किती महत्त्वाचे आहे, हेसुद्धा याच दरम्यान कळलं.
- रत्नपाल जाधव, एसटीचे कर्मचारी
१ जून १९४८ साली पहिली एसटी नगरहून तीस प्रवासी घेऊन पुण्याला निघाली. या पहिल्या ऐतिहासिक प्रवासी वाहनाचे चालक होते किसन राऊत व वाहक होते लक्ष्मण केवटे, जे दोघे आजही एसटीचे बदललेले रूप पाहताहेत. वाहक केवटे यांनी पहिलं ९ पैशाचं तिकीट फाडून गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांना दिलं. केवटे यांनी गाडीला डबल बेल देताच महाराष्ट्राचा हा प्रगतीचा रथ पुण्याच्या दिशेने झेपावला आणि राज्याच्या प्रगतीची चाकं या सरकारी वाहनाच्या रूपानं धावू लागली.
पहिली गाडी पुण्यात येईपर्यंत ठिकठिकाणी लोकांनी हे प्रवासी वाहन बघण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या गावात हे सरकारी वाहन यावं यासाठी सगळा गाव अंगमेहनत करून रस्ता तयार करत असे व ज्या दिवशी हे वाहन पहिल्यांदाच गावात येणार तो दिवस गावकऱ्यांसाठी सणासारखा असे. वाहनाची महिलांकडून ओवाळणी केली जायची. गावागावात या वाहनांची मागणी वाढू लागली, केवळ ३६ बेर्ड फोर्ड गाड्यावर एसटीची सुरूवात झाली. १ जूनला एसटीला ७२ वर्ष पूर्ण होत आहेत.
एसटीचा हा ७२ वर्षाचा प्रवास सोपा नव्हता. खाजगीकरणाचे संकट तर एसटी पाचवीला पुजलेले असते. त्या संकटावर ही मात करत एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावते आहे. १८ हजार विविध प्रकारच्या बसेस, १ लाख १० हजार कर्मचारी, ६५ लाख किमी एसटीचा रोजचा प्रवास, ६०९ बस स्थानके, २५० स्वतंत्र डेपो, तीन प्रादेशिक कार्यशाळा, ३३७४ मार्गस्थ थांबे, २२ कोटींचे दररोजचे उत्पन्न हा एसटीचा एकूण कारभार थक्क व अचंबित करणारा आहे.
एसटी सेवा सुरु झाल्यावर अनेक वर्ष गावात एसटी स्टॅण्ड नव्हते, डेपो नव्हते. गावच्या एखाद्या नाक्यावर रात्रवस्तीची गाडी उभी करून ठेवायची. या गाडीत चालक वाहक झोपत असतं. आज शहरात घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत धावणारी माणसं आपण पाहतो. मात्र त्यावेळी ग्रामीण भागात एसटीच्या वेळेनुसार घड्याळाचे काटे फिरत असत. एसटी गेल्यानंतर किती वाजले असावेत हे समजत असे.
नव्वदीच्या दशकांत देशभर खाजगीकरणाचे वारे सुरु झाले व एसटीलाही खाजगीकरणाचा फटका बसू लागला. खाजगी गाड्यांचा सुळसुळाट सुरू झाला. एसटीचं आता कंबरडे मोडतेय की काय, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. यातूनही अथक परिश्रमाने एसटी उभी राहिली.
आज एसटीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या आरामदायी गाड्या आहेत. नवीन आलेल्या माइल्ड स्टीलच्या बांधणीच्या गाड्या आहेत. वातानुकूलित, बिगर वातानुकूलित अशा ही काही गाड्या आहेत. विठ्ठल भक्तांसाठी खास विठाई गाडी सुरू केलेली आहे.
एसटीने समाजातील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सेनानी, अपंग, पत्रकार, आजारी व्यक्ती यांना तिकीट दरात सवलती दिल्या. बिरसामुंडा पुनर्वसन प्रकल्पात शरण आलेल्या नक्षलवादी तरुणांना नोकरी, मा.बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत देशसेवा करताना शहीद झालेल्या वीरपत्नींना एसटीत नोकरी आदी उपक्रमांतून एसटीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ८ वी ते १२ वी च्या मुलींना गावापासून काही किलोमीटर दूर असलेल्या माध्यमिक शाळांमध्ये जाता यावे म्हणून मानव विकास मिशन प्रकल्पाअंतर्गत निळ्या रंगाच्या गाड्या सुरू केल्या आहेत. या निळ्या बसेसचा दिवसभरात सुमारे ७५ हजार विद्यार्थिनी विनामूल्य फायदा घेत आहेत.
आजचा एसटीचा ७२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या विळख्यात साजरा करावा लागणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा थेट परिणाम एसटीवरही झाला आहे. रोजचं उत्पन्न घटलं. पण एसटीला लालडब्बा म्हणून हिणवणाऱ्या लोकांना पुन्हा एसटीचं सामाजिक काम किती महत्त्वाचे आहे, हेसुद्धा याच दरम्यान कळलं. संकटसमयी एसटी व एसटीचा सर्वसामान्य वाटणारा कर्मचारी कसा उपयोगी पडतो हे अख्ख्या जगाने पाहिलं. लॉकडाउन झाल तेव्हापासून ठाणे, मुंबई, पालघर येथून रोज ४०० एसटी गाड्या ५८ विविध मार्गावर धावत आपत्कालीन व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने आण करतात. मुंबई, ठाणे, पनवेल, बदलापूर, वसई-विरार पालघर, भिवंडी येथून धावण्याची जोखीम एसटीने उचलून यशस्वी केली आहे. आपल्या गावी पायी निघालेल्या परप्रांतीय मजुरांनाही मदतीचा हात दिला तो एसटीनेच. एसटी महामंडळाने अनेक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर नेऊन सोडायचं काम केलेले आहे. लांबचा प्रवास, उष्णता आणि कोरोनाची लागण होण्याची भीती असतानाही एसटीच्या चालकांनी केलेल्या कामाला सलाम आहे.
अनेक ठिकाणी शिक्षणासाठी अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाराष्ट्रात असणाºया घरी एसटीनेच आणलं आहे. हळूहळू काही जिल्ह्यातील अंतर्गत प्रवासी सेवा अटी व शर्ती घालून सुरु झालीय पण प्रमाण फार तुरळक आहे. एसटीचा तोटा हा न भरून निघणारा आहे, पण जमेची बाजू म्हणजे एसटीने मालवाहतूकीत केलेलं पदार्पण. जर नीट प्रचार झाला तर मालवाहतुकीचा हा पर्याय एसटीला काही प्रमाणात तारू शकतो. अनेक नव्या नव्या गोष्टी एसटीला सुरु कराव्या लागतील. कोरोनाच्या लढाईतील एसटीचं योगदान कोणालाही विसरता येण्यासारखं नाही.
(संकलन : स्नेहा पावसकर)