कर्मचाऱ्यांच्या LIC चा हप्ता ST ने भरलाच नाही; मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 06:08 AM2021-05-16T06:08:53+5:302021-05-16T06:09:07+5:30
एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. संघटनांचा सरकारला सवाल
प्रसाद कानडे
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कापला खरा, पण तो एलआयसीकडे भरलाच नाही. त्यामुळे या चार महिन्यांत कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. एसटीच्या ह्या भोंगळ कारभारामुळे अनेक कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन थकले नसले, तरी एलआयसीचा हप्ता न भरणे हा कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. एसटीने जवळपास २० कोटी रुपये एलआयसीकडे भरलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. एसटी प्रशासनाने ९ कुटुंबे सोडता अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मदत केलेली नाही.
२३९ कर्मचारी मृत; मदत केवळ ९ जणांना
आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एसटीच्या २३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पैकी ९ जणांना ५० लाख रुपयांचे आर्थिक साह्य केले. एलआयसीचा हप्ता थकविला त्या काळात १०० ते १५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत केलेली नाही.
जवळपास २४०० कोटी थकविले
एसटीचा आतापर्यत संचित तोटा हा ९ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. जवळपास २४०० कोटी रुपये थकविले आहे. यात एसटी बँक, एलआयसी, डिझेल , सुरक्षा, ब्रिक्स कंपनी, सेवा निवृत्त कर्मचारी आदींचा समावेश आहे.
एलआयसीचे कापून घेतलेले हप्ते भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पॅालिसी लॅप्स होत असलेले मेसेजेस येत आहेत. बँक सोसायटीचीही तीच अवस्था आहे. आमचे हक्काचे पैसे व त्याचा डिव्हिडंड आम्हाला मिळू शकत नाही. दुर्दैवाने मृत्यू आला तर भरपाई कोण देणार? - संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.