एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मृत्युपूर्वी केला होता अन्नत्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 08:23 PM2021-11-14T20:23:48+5:302021-11-14T20:23:59+5:30
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे
अहमदनगर: घरीच उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचार्याचा रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नगरमध्ये घडली. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. राठोड हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. राठोडही या संपात सहभागी झाले होते. त्यांनी नगर शहरातील तारकपूर येथील संपात सहभाग घेतला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते उपाशी होते. असे समजते. रविवारी ते नगर जवळील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
याबाबत त्यांच्या मुलाने सांगितले की, त्यांचा पगार सात हजार रूपये इतका झाला होता. दिवाळीचा बोनस ही अडीच हजार रूपये मिळाला होता. लॉकडाऊन काळात चार महिने केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही. सात हजार रूपयात घर खर्च कसा चालणार या चिंतेत ते होते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांनी जेवणही घेतले नव्हते.