एसटी कर्मचारी : वेतनवाढीवर आज होणार फैसला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:45 AM2018-04-02T05:45:22+5:302018-04-02T05:45:22+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्यक्ष दिवाकर रावते उपस्थित राहणार आहे.
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर आज निर्णय होण्याची चिन्हे आहेत. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने दिलेल्या पत्रानुसार महामंडळाने मुंबई सेंट्रल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत एसटी अध्यक्ष दिवाकर रावते उपस्थित राहणार आहे. महामंडळाने राज्यातील महामंडळाच्या २१ संघटनांचे पदाधिकारीदेखील बोलावले आहेत. सोमवारी मुंबई सेंट्रल आगार येथे दुपारी २ वाजता होणा-या बैठकीत राज्यातील सर्व कामगारांचे लक्ष राहणार आहे.
गतवर्षी दिवाळीत एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी संप पुकारला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्यात आला होता. दरम्यान, आयोग कृती समिती आणि महामंडळ यांच्यात अनेक बैठका पार पडल्या. मात्र त्यातून काही ठोस निर्णय झाला नाही. महामंडळात एक लाखाहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे २४ महिने उलटूनही वेतन करार न झाल्याने कामगारांना वेतनवाढ मिळालेली नाही. देशातील अन्य महामंडळाच्या तुलनेत राज्यातील एसटी कामगारांचे वेतन कमी आहे. आधीच वेतन कमी आणि करार न झाल्याने तब्बल २०० पेक्षा जास्त कर्मचाºयांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्ज करत स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे.
विशेष बैठक म्हणजे नेमके काय?
महामंडळातील कर्मचाºयांच्या वेतनासंबंधी मान्यताप्राप्त संघटना म्हणून तडजोड करण्याचा अधिकार महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेला आहे. याआधीदेखील वाटाघाटीच्या अनेक बैठका पार पडल्या. उच्चस्तरीय समितीच्या अहवालानुसार ७४१ कोटींच्या प्रस्तावापुढे जाण्यास एसटी प्रशासन तयार नसल्याने या बैठका निष्फळ ठरल्या. परिणामी सोमवारी होणाºया बैठकीत महामंडळातील
२१ संघटना उपस्थित राहतील. राज्यातील सर्व संघटनांसमक्ष
बैठक होणार असल्याने ठोस निर्णय अपेक्षित आहे.
महामंडळाचा निर्णय स्वागतार्ह
कामगारांच्या वेतनवाढीसाठी मान्यताप्राप्त संघटनेने महामंडळाला पत्र दिले होते. सोमवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या वेळी सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनादेखील बोलावण्यात आले आहे. महामंडळाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या बैठकीत महामंडळाने उच्चस्तरीय समितीच्या असमाधानकारक शिफारशीपेक्षा पुढे जात बोलणी केल्यास कामगारांना त्वरित वेतनवाढ मिळणे शक्य आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना (मान्यताप्राप्त)
‘इन कॅमेरा’ बैठक घ्या...
वेतनकरार संपून २४ महिने
उलटूनही ठोस निर्णय होत नसल्याने कर्मचाºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे. परिणामी राज्यातील विविध आगारांतील कामगारांनी समाजमाध्यमातून संघटना आणि महामंडळ यांच्यातील वेतनाबाबत होणाºया बैठका ‘इन कॅमेरा’
घेण्याची मागणी केली आहे.