एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; महागाई भत्त्यातही झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 07:28 PM2018-10-22T19:28:31+5:302018-10-22T19:28:49+5:30
एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.
मुंबई : एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सोमवारी केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे. याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरीम वेतन वाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. यामित्ताने मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली.
मंत्री रावते म्हणाले की, एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनुक्रमे २५०० आणि ५००० रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी – कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट तातडीने देण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के अंतरीम वेतनवाढ एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरीम वाढ करण्याचा निर्णयही रावते यांनी आज जाहीर केला. ऑक्टोबर २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होईल.
एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी वेतनवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही वेतनवाढ देण्यात येणार आहे. याबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सुचीत केले असून त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी, या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरीम वाढ करण्यात येत असल्याचे मंत्री रावते यांनी जाहीर केले. ऑक्टोबर २०१८ पासून ही अंतरीम वेतनवाढ लागू होत असून समितीच्या अहवालानंतर अंतिम वेतनवाढ लागू केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.
एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ
एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करुन मंत्री रावते यांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली. त्यानुसार राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारीत झाले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमााणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल.
एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील मागील थकबाकीतील ५ हप्त्यांची रक्कमही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ नोव्हेंबर रोजी त्यांना अदा करण्यात यावी, असे आदेशही महामंडळाला देण्यात आल्याचे मंत्री रावते यांनी सांगितले.