ST कर्मचा-यांचा संप : राज्य सरकारच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी केली मुंडण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 04:41 PM2017-10-19T16:41:13+5:302017-10-19T16:43:17+5:30
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून अद्याप कामगारांची मागणी मान्य न झाल्याने संतप्त कामगारांनी सरकारच्या निधेषार्थ मुंडण केले.
कल्याण - सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून अद्याप कामगारांची मागणी मान्य न झाल्याने संतप्त कामगारांनी सरकारच्या निधेषार्थ मुंडण केले.
राज्य सरकार व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. कामगारांची दिवाळी अंधारात लोटणा-या सरकारला कर्मचा-यांनी चिल्लर गोळा करुन दिवाळीची भेट देत निषेध व्यक्त केला. संपादरम्यान अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील बस डेपोतील एसटी कर्मचा-याचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ कामगारांनीही जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनात महिला कामगार सहभागी झाल्या होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात सलग तिसऱ्या दिवशी सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बुधवारी सकाळी तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नव्हते. अखेर रावते संध्याकाळी ५ वाजता मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात पोहोचल्यावर बैठकीस सुरुवात झाली. यावेळी कामगार संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यालयाच्या कॉन्फरन्स सभागृहात चर्चेसाठी उपस्थित होते. सायंकाळी ७ च्यासुमारास एसटी प्रशासन आणि कामगार संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात बैठकीला सुरुवात झाली. सातव्या वेतन आयोगाची मागणी मागे घेतल्याशिवाय संपावर तोडगा निघणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यास नकार दिला. त्यामुळे मध्यरात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत चाललेल्या बैठकीत संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी संप कायम राहणार आहे.