ST Employee Strike: संपामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:37 AM2021-11-02T07:37:22+5:302021-11-02T07:37:33+5:30

एसटीचे राज्यातील २५० पैकी ३६ आगार बंद. कामगार संघटनांनी अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर बहुतांश आगार २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाले, तर ३५ आगारांमधील कर्मचारी एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

ST Employees on strike; passengers in problem in Diwali | ST Employee Strike: संपामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

ST Employee Strike: संपामुळे ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांचे हाल; कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी ३६ आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या संपामुळे त्या भागातील प्रवाशांचे हाल होणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी पुकारलेले उपोषण गुरुवारी मागे घेण्यात आले होते; मात्र आता विलीनीकरणाच्या मुद्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहेत. या संपामुळे राज्यभरात सोमवारी  ३६ आगार बंद होते. यात औरंगाबाद विभागातील ४७ पैकी सर्वाधिक १५ आगार, त्यानंतर नागपूर क्षेत्रातील २६ पैकी १२ आगार बंद करण्यात आले. तसेच पुणे विभागातील चार, नाशिकमधील तीन, अमरावतीमधील दोन  आगार  सध्या आंदोलनामुळे बंद आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरपासून सुरू असलेले त्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे औद्योगिक न्यायालयाने घोषित केले असले तरी, उपक्रमाने कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस बजावली नाही. कर्मचाऱ्यांनी महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पगार वाढवण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनामुळे राज्यात १९० आगार बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार संघटनांनी अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर बहुतांश आगार २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुरू झाले, तर ३५ आगारांमधील कर्मचारी एमएसआरटीसीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

बस सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली येथील सर्व आगार  आणि मराठवाड्यातील नांदेड आणि लातूरमधील बहुतांश आगार आंदोलनामुळे बंद आहेत. आम्ही राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे. सणासुदीच्या काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जास्तीत जास्त आगारातून बस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष,एसटी महामंडळ

कारवाई करू नका
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, तसेच राज्यात आंदोलन केलेल्या कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये. अन्यथा राज्यातील सर्व एसटी वाहतूक बंद करण्यात येईल. 
    - प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते विधान परिषद

‘दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा’
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवासी गर्दी वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासार्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण दिवाळीनंतर चर्चा करणार असल्याचेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला म्हणजेच दिवाळीपूर्वी देण्याची जाहीर केले होते. त्यानुसार सुधारित महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट सोमवारी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: ST Employees on strike; passengers in problem in Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.