नियोजनशून्य कारभारामुळे एसटी कर्मचारी तणावात
By admin | Published: September 29, 2016 12:58 AM2016-09-29T00:58:18+5:302016-09-29T00:58:18+5:30
वाहक- चालक हे एसटी महामंडळाचे आत्मा आहेत़ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे़ वाहक-चालकांची मानसिक स्थिती, ताणतणाव
पिंपरी (पुणे) : वाहक- चालक हे एसटी महामंडळाचे आत्मा आहेत़ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला आहे़ वाहक-चालकांची मानसिक स्थिती, ताणतणाव जाणून घेऊन अधिकाऱ्यांनी निर्णायक भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे आयोजित तीन दिवसीय वाहक-चालक सपत्निक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सीआयआरटीच्या इमारतीत रावते यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते़ प्रादेशिक परिवहन विभागप्रमुख जितेंद्र पाटील, सीआयआरटीचे प्रभारी आशिष मिश्रा, राज्य परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक सूर्यकांत अंबाडेकर, के ़ माधवराज, बी़ एम़ जाधव हे यावेळी उपस्थित होते़
चालकांना अनेक अडचणी आहेत़ त्यांची मानसिकता अधिकाऱ्यांनी समजवून घेतली पाहिजे़ प्रवाशांची काळजी घेण्यासाठी वाहक आणि चालक जबाबदारी पार पाडतात़ त्यासोबत त्यांच्या पत्नी महत्त्वाची भूमिका निभावतात, असे सांगू रावते यांनी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा गौरव केला़ काही दिवसांपूर्वी कामचुकारपणा केल्यामुळे सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते़ मात्र, कुटुंब सार्वजनिक योजनेंतर्गत त्या सर्वांना पुन्हा एकदा संधी देऊन कामावर घेण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे़ प्रवाशांची काळजी घेण्यासाठी अधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य कामगारापर्यंत सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाहनचालकांच्या मुलांसाठी आॅटोमोबाइल महाविद्यालयाची स्थापना करण्यात येत आहे़ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पांढरकवडा, नाशिक, पालघर, गडचिरोली, रत्नागिरी येथे उच्च दर्जाची प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत, असे रावते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)