एसटी कामगारांच्या वेतन कराराला ‘आचारसंहिता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 05:39 AM2018-05-01T05:39:48+5:302018-05-01T05:39:48+5:30
तब्बल २४ महिन्यांपासून रखडलेला वेतन करार महाराष्ट्र दिनीदेखील होणार नसल्याचे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्पष्ट केले आहे
मुंबई : तब्बल २४ महिन्यांपासून रखडलेला वेतन करार महाराष्ट्र दिनीदेखील होणार नसल्याचे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने राज्यात लोकसभा व अन्य पोटनिवडणुकांमुळे आचारसंहिता लागू केली आहे. २ जून अखेर ही आचारसंहिता असल्यामुळे, तूर्तास वेतन कराराची घोषणा होणार नसल्याचे महामंडळाने जाहीर केले.
महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर एक लाखांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात घोषणा करण्यात येईल, असे आश्वासन या महिन्याच्या सुरुवातीलाच परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्या वेळी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी राज्यातील ३५ पैकी २८ जिल्ह्यांना २ जूनअखेर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या काळात कुठलीही घोषणा करण्यास प्रतिबंध आहे.
दरम्यान, या प्रकरणी सोमवारी झालेल्या बैठकीत मान्यताप्राप्त संघटना ३१/०३/१६चे मूळ वेतन+३५०० गुणिले २.५७ या आपल्या प्रस्तावावर ठाम राहिली. एसटी अध्यक्ष तथा परिवहनमंत्री यांनी फक्त भत्ते व सीटीसी वगळता ७५०/- कोटींचे देऊ केले व यामध्ये आपले सूत्र बसविण्याचा आग्रह केला, परंतु यामध्ये आयोगाचा २.५७चा प्रस्ताव बसत नाही. त्यामुळे मूळ वेतन गुणिले २.४१, तसेच मूळ वेतनात वाढ नाही, असा प्रस्ताव संघटनेसमोर ठेवण्यात आला. मात्र, मंत्री रावते यांच्या दोन्ही प्रस्तावात असमाधानकारक वाढ असल्यने संघटनेने प्रस्ताव फेटाळला. आम्ही केव्हाही चर्चेस तयार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मान्यताप्राप्त संघटनेने दिली.