खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

By admin | Published: November 10, 2014 04:22 AM2014-11-10T04:22:38+5:302014-11-10T04:22:38+5:30

ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे

ST nerves due to potholes | खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

खड्ड्यांमुळे एसटी खिळखिळी

Next

ठाणे : ठाणे ते नाशिक या दरम्यानच्या महामार्गावर खड्ड्यांचा कहर झाला आहे. टोल कंत्राटदार त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात चालढकल करत आहे. त्यामुळे या मार्गावरून रोज धावणाऱ्या जवळपास अडीचशे बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस बिघडण्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. एकीकडे हे संकट आणि दुसरीकडे आवश्यक त्या सुट्या भागांची तातडीने न होणारी खरेदी यामुळे एसटी कचाट्यात सापडली आहे.
या महामार्गावर मुलुंड टोलनाका, खारीगाव टोलनाका, पडघा टोलनाका आणि घोटी टोलनाका अशा चार ठिकाणी टोल वसूल होतो. मुंबई व ठाणे शहरांतला महामार्ग उत्तम आहे. परंतु, ठाणे ते नाशिक दरम्यानच्या महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या खड्ड्यांची दुरुस्ती आणि बांधणी पेव्हर ब्लॉकने करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ९ इंच ते १ फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. त्यांची दुरुस्ती टोल ठेकेदार करीत नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुरेशा गतीने प्रवासही करता येत नाही. खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे आणि अ‍ॅक्सल यांची हानी मोठ्या प्रमाणावर होते आहे. खड्ड्यांमुळे बसणाऱ्या हादऱ्यांमुळे वेगवेगळे सुटे भाग जोडणारे नट आणि बोल्ट सैल होऊन त्यातून वेगळेच दुखणे ओढवते आहे.
ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात टोल मिळतो, तरीही खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवासी आणि चालक यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास वेगळाच आहे. खासगी वाहनांची होणारी झीज आणि ती बंद पडणे, या त्रासातही सध्या प्रचंड भर पडली आहे. शपथविधी आणि मंत्रिपदांचे वाटप यात गुंतलेल्या नव्या सरकारला या महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघायला वेळ नाही. सतत हादरे बसून प्रवाशांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे एसटीची आणि वाहनचालकांची अवस्था ‘असून नाथ आम्ही अनाथ’ अशी झाली
आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: ST nerves due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.