महिला चालक प्रक्रियेला महामंडळाकडून ब्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:40 AM2018-11-05T06:40:35+5:302018-11-05T06:40:47+5:30
महामंडळाच्या परीक्षेत पास होऊनही एसटी चालक होण्याचे महिला प्रवाशांचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. कारण एसटी महामंडळाने घेतलेल्या चालक परीक्षेत २०० महिला उत्तीर्ण झाल्या. मात्र.
- महेश चेमटे
मुंबई - महामंडळाच्या परीक्षेत पास होऊनही एसटी चालक होण्याचे महिला प्रवाशांचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. कारण एसटी महामंडळाने घेतलेल्या चालक परीक्षेत २०० महिला उत्तीर्ण झाल्या. मात्र, परीक्षेत पास होऊनदेखील महामंडळाने या महिलांच्या पुढील चाचणीबाबत कोणतीही प्रक्रिया पार पाडलेली नाही. यामुळे महिला चालक प्रक्रियेला महामंडळाकडून ‘ब्रेक’ लागला असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहनमंत्री आणि
एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी महामंडळात ‘महिला चालकदेखील एसटी चालविणार’ अशी घोषणा केली. त्यानुसार,
एसटी महामंडळात ७ हजार ९२९ चालक-वाहकांची पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली. यात सुमारे ४४५ महिला चालकांनी अर्ज केले. त्यापैकी २०० महिला परीक्षेत पास झाल्या. मात्र त्यानंतर, संबंधित महिला चालकांच्या पुढील प्रक्रिया मात्र पार पडली नाही.
एसटीतील २०० महिला चालकांच्या पुढील कारवाईबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी व्यस्त आहे, नंतर बोलू’ असे सांगून उत्तर देणे टाळले. पुन्हा संपर्क साधला असता, त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही.
देशातील प्रवासी वाहतूक महामंडळापैकी एसटी महामंडळ सर्वात मोठे प्रवासी महामंडळ आहे. एसटीतून रोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. महामंडळाचे रोजचे उत्पन्न सुमारे २० कोटी आहे. महामंडळात एक लाखांहून अधिक कर्मचारी असून, महिला चालकांचा महामंडळात समावेश झाल्यास देशातील पहिले महिला चालक असलेले प्रवासी महामंडळ म्हणून एसटी महामंडळाचा गौरव होईल.
कागदपत्रांत त्रुटी असल्याचे कारण
याबाबत महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, २०० महिला चालकांच्या भरती प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये त्रुटी होत्या. महिला चालक भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश असल्यामुळे भरती प्रक्रियेमध्ये महिला चालकांचादेखील समावेश करण्यात आला. महिला चालकांचा महामंडळात समावेश केला असता, महिला चालक असलेले एकमेव महामंडळ असा लौकिक एसटी महामंडळाला प्राप्त झाला असता. मात्र, २०० महिला चालकांची प्रक्रिया तूर्तास तरी स्थगित करण्यात आली आहे.