‘एसटी’ने मोटर वाहन कायदा बसविला धाब्यावर
By admin | Published: September 2, 2016 06:06 PM2016-09-02T18:06:49+5:302016-09-02T18:06:49+5:30
काटकसरीचे धोरण राबविताना ‘एसटी’ महामंडळाने कायदा धाब्यावर बसविला आहे. वाहकांशिवाय बसेस मार्गावर धावत आहे
Next
>- विलास गावंडे / ऑनलाइन लोकमत
विनावाहक फे-या : काटकसरीच्या धोरणात प्रवाशांची गैरसोय
यवतमाळ, दि. 2 - काटकसरीचे धोरण राबविताना ‘एसटी’ महामंडळाने कायदा धाब्यावर बसविला आहे. वाहकांशिवाय बसेस मार्गावर धावत आहे. या धोरणात प्रवाशांचीही गैरसोय होत आहे, रोजगार निर्मितीच्या संकल्पनेलाही मूठमाती दिली जात आहे. हा सर्व प्रकार ‘एसटी’ची खासगीकरणाकडे वाटचाल तर नसावी, या शंकेला जन्म देणारी ठरत आहे. तसा एसटी कामगारांचाही सूर आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी तज्ज्ञ चालक आणि वाहकांची अनिवार्यता मोटर वाहन कायद्यात नमूद करण्यात आली आहे. एसटी आणि खासगी वाहतुकीलाही हा नियम लागू आहे. खासगी वाहनांमध्ये तज्ज्ञ वाहकच राहात नाही. एसटी महामंडळाने तर वाहकाला बाद केले आहे. साधारणत: १५० किलोमीटरपर्यंतच्या फेरीसाठी विनावाहक बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. विदर्भात ७० ते ८० बसेस वाहकांशिवाय धावतात.
अश्वमेघ, शिवनेरी या बसेसचे लोण लाल डबा, हिरकणीपर्यंत पोहोचले आहेत. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी विभागांनी ही कास धरली आहे. विनावाहक बसेसमधून पैशाची बचत होत आहे काय, प्रवासी वाढून उत्पन्नात उन्नती होत आहे काय, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय नक्कीच सुरू आहे. बसमध्ये वाहक नसल्याने ब्रेकडाऊनमध्ये किंवा अपघातप्रसंगी चालकाला कुणाचाही आधार नसतो. एकाकी पडलेल्या चालकाला प्रवाशांची मदत घ्यावी लागते.
विनावाहक वाहतुकीमुळे थांबे कमी झाले आहेत. तालुका बसस्थानकावरही या बसेस थांबत नाही. बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने, प्रवासी एसटीपासून दूर जात आहे. महामंडळ आणि महाराष्ट्र शासनाने खासगी वाहतुकदारांना प्रोत्साहन देऊन भविष्यात महामंडळाचे खासगीकरण तर करणार नाही ना, अशी शंका कामगारांमधून उपस्थित केली जात आहे. शिवाय महामंडळाच्या रोजगार निर्मितीच्या संकल्पनेलाही ठेच पोहोचत आहे. विनावाहक बस धावत असल्याने आपसुकच वाहकांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे या पदासाठीची भरतीही अपवादानेच होणार आहे.
विनावाहक बस ही महामंडळाची कृती मोटर वाहन कायद्याचा भंग करणारी आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी दिलेल्या प्रवासी वाहतुकीच्या परमीटमध्ये नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन करणारी आहे. शिवाय महामंडळाच्या नुकसानीसाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे कुठलीही बस विनावाहक धावू नये, अशी अपेक्षा आहे.
- एम.आर. बैस, विभागीय कार्याध्यक्ष, राज्य परिवहन चालक, वाहक, यांत्रिक कामगार मित्र संघटना, यवतमाळ