एसटी प्रवाशांना ३० रुपयांत चहा-नाश्ता!
By admin | Published: October 28, 2016 01:41 AM2016-10-28T01:41:23+5:302016-10-28T01:41:23+5:30
एसटी बसच्या अधिकृत खासगी थांब्यांवर आॅगस्ट महिन्यापासून ३० रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र बहुतांश प्रवासी अद्याप याबाबत अनभिज्ञ
मुंबई : एसटी बसच्या अधिकृत खासगी थांब्यांवर आॅगस्ट महिन्यापासून ३० रुपयांत चहा-नाश्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र बहुतांश प्रवासी अद्याप याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे आता याची माहितीपत्रके वाहकांमार्फत पोहोचविण्याचे महामंडळाने ठरविले आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस ही पत्रके प्रवाशांना वाटण्यात येणार आहेत.
महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा यापैकी एक पदार्थ आणि चहा प्रवाशांना घेता येणार आहे. सध्या २२ अधिकृत थांब्यांवर ही सुविधा सुरू करण्यात आली असून लवकरच आणखी १०० थांब्यांवर ती सुरू करण्यावर विचार केला जात असल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.
खासगी अधिकृत थांब्यांवरही अवाजवी दर आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी महामंडळाकडे येत होत्या. त्याचा अभ्यास करून महामंडळाने अहवाल तयार केला आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ३० रुपयांत दर्जेदार चहा व नाश्ता देण्याच्या सूचना आॅगस्ट महिन्यात अधिकृत थांबा असलेल्या उपाहारगृहांना देण्यात आल्या. तसेच खाद्यपदार्थांचे दरपत्रक प्रवाशांना सुस्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावण्याचेही त्यांना बजावण्यात आले आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची असुविधा झाल्यास संबंधित उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई केली जाणार आहे, तर जादा दर मागितल्यास थांबाही रद्द करण्यात येऊ शकतो, असे महामंडळाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)