एसटी पुरविणार बससेवा
By admin | Published: June 3, 2016 12:48 AM2016-06-03T00:48:22+5:302016-06-03T00:48:22+5:30
औद्योगिक तसेच आयटी कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना आणि कंपन्यांच्या परिसरातील कामगारांना प्रवासी वाहतूकसेवा पुरविण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतला आहे.
पुणे : औद्योगिक तसेच आयटी कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना आणि कंपन्यांच्या परिसरातील कामगारांना प्रवासी वाहतूकसेवा पुरविण्याचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर राजगुरुनगर बसस्थानकाहून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांमध्ये कामाला जाण्याची
सोय व्हावी, यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बस सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दोन खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १०० पास काढले आहेत.
ही योजना यशस्वी झाल्यास त्याचा वापर पुणे विभागात सुरू केला जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली. खासगी बस कंपन्यांना स्पर्धा करण्यासाठी, तसेच प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे मैंद यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
पुणे शहराच्या परिसरातील औद्योगिक कंपन्यांना अनेकदा हंगामी कर्मचाऱ्यांना बसची गरज असते. तर, या खासगी बसच्या तुलनेत एसटीच्या गाड्यांचे दर कमी आहेत. त्यामुळे ही सेवा देण्यासाठी एसटीने पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)
>स्वारगेट, शिवाजीनगरची सुरक्षितता वाढविणार
शहरात एसटीचे स्वारगेट, शिवाजीनगर, तसेच पुणे स्टेशन हे तीन प्रमुख बसस्थानके आहेत. या स्थानकांच्या परिसरात बंदी असतानाही खासगी वाहने सर्रास येतात. काही वेळेला एजंट बसस्थानकांवर येऊन प्रवाशांना खासगी वाहनांमधून नेण्यासाठी गळ घालतात. हे प्रकार थांबवण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड बसस्थानकांच्या प्रवेशद्वारांवर प्रशस्त गेट लावण्याचे काम काही दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. स्वारगेट बसस्थानकामध्ये शंकरशेठ रस्त्यावर अशा प्रकारचे गेट लावले असून, सातारा रस्त्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात येणार आहे.
या सर्व प्रवेशद्वारांवर २४ तास सुरक्षारक्षक नेमला जाईल. याशिवाय या स्थानकांमध्ये असलेली प्रवाशांची गर्दी, तसेच आवश्यक सुरक्षितता लक्षात घेऊन जादा सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, बंद असलेले मेटल डिटेक्टर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.
पुण्यातून सुरू असलेली शिवनेरी बससेवा आणखी विस्तार आहे. येत्या काही दिवसांत पुणे विभागात आणखी १५ नवीन स्कॅर्निया बस दाखल होणार आहेत. या पूर्वीच १५ बस दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना आणखी आरामदायी सेवा देण्यासाठी नवीन मार्गांची आखणीही एसटी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.