‘एम-इंडिकेटर’वर एसटीचे वेळापत्रक
By admin | Published: May 17, 2017 03:49 AM2017-05-17T03:49:09+5:302017-05-17T03:49:09+5:30
प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह अन्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसचे वेळापत्रक अॅपच्या अपडेट व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या बससोबत वातानुकूलित श्रेणीत धावणारी ‘शिवनेरी’ बसची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘गाव तेथे एसटी’ या धोरणानुसार राज्यभर एसटीचे जाळे पसरले आहे. सुमारे ६६ लाख एसटीचे प्रवासी आहेत, तर राज्यात रोज १८ हजार बस धावतात. या अॅपमुळे लाखो प्रवाशांना घरबसल्या बस क्रमांकासह सर्व माहिती मिळणार आहे. अॅपमध्ये राज्यातील बस डेपोचे दूरध्वनी क्रमांक आहेत.
प्रवाशांनी हरकती नोंदवल्यास एसटी बसच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शवली आहे. रेल्वेचे वेळापत्रक पूर्वीपासून अॅपवर आहे. सुधारित व्हर्जनमध्ये पीएनआर नंबर, तिकिटांचे स्टेटस, ट्रेनमधील उपलब्ध आसन व्यवस्था, ट्रेनचे तिकीट यांचाही समावेश आहे. अॅपमध्ये मोनो, मेट्रो, लोकल, बस, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक, तर रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट यांचे दरपत्रक आणि वेळापत्रक आहे.