Sharad Pawar : "सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, सर्व मागण्या मान्य होतील"; शरद पवारांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:48 PM2022-01-10T18:48:35+5:302022-01-10T18:59:04+5:30
ST Strike And Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. "सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील" असं आवाहन शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे. तसेच एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे समितीच्या अहवालानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असंही म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरू झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. तसेच विलिनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका काय आहे या प्रश्नावर बोलताना "आपल्याला यावर राजकारण करायचे नाही. एसटीची बांधिलकी ही प्रवाशांशी आहे. विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही" असं म्हटलं आहे.
एसटी संपाबाबत कृती समितीबरोबर आज विस्ताराने चर्चा केली. माझ्या दृष्टीने प्रवासी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याबद्दलचे वर्णन न केलेले बरे. त्यातच कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळे महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळले आहे. pic.twitter.com/vTly8wDnPA
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 10, 2022
"संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत"
"कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत" असं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळे महाराष्ट्रावर आणखी एक संकट"
"एसटी संपाबाबत कृती समितीबरोबर आज विस्ताराने चर्चा केली. माझ्या दृष्टीने प्रवासी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेले दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याबद्दलचे वर्णन न केलेले बरे. त्यातच कोरोनाचा नवा अवतार आल्यामुळे महाराष्ट्रावर आणखी एक संकट कोसळले आहे. अशी वेळ आधी कधीही आली नव्हती. मी यापूर्वी अनेकदा एसटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उपस्थित होतो. त्यावेळी एसटी कामगारांचा दृष्टिकोन एसटी आणि प्रवाशांबाबत विधायकच असतो हे मी जाणतो" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.