एसटीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय
By admin | Published: October 10, 2016 06:10 AM2016-10-10T06:10:27+5:302016-10-10T06:10:27+5:30
एसटी महामंडळाने अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून
सुशांत मोरे / मुंबई
एसटी महामंडळाने अद्ययावत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, पुण्यातील स्वारगेट येथे पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांत बांधल्या जाणाऱ्या या रुग्णालयामध्ये १00 खाटांची व्यवस्था असेल.
परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात जानेवारी महिन्याच्या अखेरीस पार पडला होता. त्या वेळी अनेक योजनांचा आणि घोषणांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये एसटीकडून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचीही घोषणा करण्यात आली होती. रुग्णालयासाठी जागेचा शोध घेऊन सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट आगाराच्या मागे असलेल्या कार्यशाळेच्या जागेत रुग्णालय उभारण्यात येईल. त्यातील २५ टक्के खाटा या एसटी कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसाठी राखीव ठेवण्यात येतील, तसेच त्यांना मोफत उपचारही देण्यात येणार आहे. पाच कोटींपेक्षा जास्त खर्च रुग्णालय उभारण्यासाठी येईल.